संगमनेर : महाराष्टÑ शासन वृक्ष लागवडीचे काम तळमळीने करते आहे. त्यांचे काम सर्वांनीच बघायला हवे. मी शासनाच्या विरोधात नसून त्यांच्या सोबतच आहे. मागे जे काही बोललो ते कुठल्याही हेतूने बोललो नव्हतो. त्यात कुठलाही स्वार्थ नव्हता. वाईट इतकेच वाटते की, कालपरवा पर्यंत जे चांगले बोलत होते. ते बोलेनासे झाले. मी एवढेच बोलेन, कागदोपत्री झाडे लावू नका. तर एखादे झाड लावून त्याच्याबरोबर सेल्फी घ्या, असे प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीवेळी म्हणाले.सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेच्या वतीने व्यापक प्रमाणात वनीकरण, जलसंधारणाची कामे गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील विविध भागात खास करून अवर्षणप्रवण भागात होत आहेत. या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील डोंगरावर दोन वर्षांपूर्वी २६ हजार रोपे लावण्यात आली. या रोपांची योग्य वाढ झाली असून त्या रोपांचा दुसरा वाढदिवस अभिनेते शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी साजरा करण्यात आला. कार्यक्रमानंतर त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत दिलखुलास चर्चा केली.अभिनेते शिंदे म्हणाले, नेहमी तेच तेच काम करून एकसुरीपणा येतो. मग कंटाळा देखील येतो. त्यातूनच असे जाणवले की झाडांची भाषा ही महान भाषा आहे. झाडांजवळ गेल्यास आपल्याला आनंदच मिळतो. ते तपश्चयेर्ला बसलेले ॠ षीमुनीच वाटतात. वृक्षारोपणाचे काम केवळ मीच करत नसून अनेक जण या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांचेही कौतुक आपण करायला हवे. झाडांसारखे निस्वार्थी कोणीही नाहीत. म्हणून झाडांवर प्रेम करा, झाडे लावा. त्यांच्या इतका आनंद तुम्हाला कोणीच देणार नाही. झाडे आपल्याला कधीच फसवत नाहीत. असेही ते म्हणाले.जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत, डॉ. सुनीता राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यकम्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वसंत बंदावणे, शाहिर तुळशीराम जाधव, अर्जुन वाळके, वेल्हाळ्याचे सरपंच गोपीनाथ सोनवणे, कासारा दुमालाचे सरपंच शरद खतोडे, राहूल लंके, प्रा. सुशांत सातपुते, वंदना बंदावणे, संजय राऊत, हरी ढमाले, संदीप सातपुते, संजय सोनवणे, अशोक खैरनार, कृष्णामाई जाधव, जयश्री जाधव, किरण खैरनार, सोमनाथ सोनवणे, बजरंग जेडगुले, राहूल वर्पे, रोहिदास बर्गे आदी उपस्थित होते. शाहिर प्रा. जाधव व समुहाने निसर्ग गीतांचे सादरीकरण केले. तालुक्यातील शाळांतील विद्यार्थ्यांनी नृत्यांमधून पर्यावरण संदर्भात प्रबोधन केले. यावेळी संगमनेर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाच्या विरोधात नसून सोबतच : सयाजी शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 1:53 PM