लोकमत न्यूज नेटवर्ककेडगाव (अहमदनगर) : अधिक महिन्यात जावयांना धोंडे जेवणास बोलावण्याची प्रथा आहे. तथापि, आगडगाव (ता.अहमदनगर) येथील काळ भैरवनाथ देवस्थानाजवळ जावयांतर्फे रविवारी धोंडे जेवणाचा उपक्रम राबविण्यात आला.
आगडगावच्या ६०० लेकी व जावयांनी २० हजार भाविकांना धोंड्याचे जेवण खाऊ घातले. देवस्थानतर्फे जावयांना पाची पोशाख व लेकींना साडी देऊन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात पूजापाठ, दान करण्याला महत्त्व असते. त्यामध्ये अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे काल भैरवनाथ देवस्थानने जावयांतर्फे ‘धोंडे जेवण’ हा उपक्रम राबविला. आगडगाव, टोकेवाडी, तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपापल्या जावयांची नोंदणी प्राधान्याने केली. याची संख्या ६०० झाली. या जावयांनी या दिवशी धोंड्याच्यामाध्यमातून अन्नदान करण्याची तयारी दर्शविली.
पुरणपोळी, आमटी भात, लापशीचा बेत जेवणाचा पुरणपोळी, आमटी भात, लापशी, धोंडे असा बेत होता. आगडगाव हे अहमदनगर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. येथे प्रत्येक रविवारी बाजरीची भाकरी-आमटी असा महाप्रसाद दिला जातो.