अहमदनगर: सरकारच्या नोटाबंदीविरोधातकाँग्रेस- राष्ट्रवादीच्या वतीने ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. ‘नोटाशेठ’चे श्राध्द घालून डाव्यांनी सरकारचा निषेध केला. भाजपाने शहरातून मोटारसायकल रॅली काढून काळ्या पैशाविरोधात जनजागृती केली. राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी केलेल्या आंदोलनांनी बुधवारी नोटाबंदीवरून शहरासह जिल्ह्यात पुन्हा राजकीय खडखडाट झाला.केंद्र सरकारच्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत गाजर दाखवून सरकारचा निषेध करण्यात आला. शहरात काँग्रेसच्या वतीने येथील हुतात्मास्मारक येथे निदर्शने करत काळा दिवस पाळण्यात आला. शेतकरी संघटना, विडी कामगार आणि प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘नोटाशेठ’च्या श्राध्दाचा विधी करण्यात आला. काँग्रेसचे माजी नगरसेवक निखील वारे यांच्या नेतृत्वाखाली सावेडी उपनगरातील एकविरा चौकात मेणबत्त्या पेटवून नोटाबंदीच्या काळात मृत पावलेल्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील तहसील कार्यालयासमोर धरणे, निदर्शने करत सरकारचा निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादीतर्फे गाजर दाखवून सरकारचा निषेध
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त खोटी आश्वासने देणा-या सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाजर दाखवून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री घुले, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, संजय झिंजे, दीपक सूळ, अमित खामकर, साहेबान जहागीरदार, गजेंद्र भांडवलकर, गहिनीनाथ दरेकर, दिलदारसिंग बीर, बाबासाहेब गाडळकर, प्रकाश भागानगरे, गौतम भांबळ, अॅड.वैभव मुनोत, भारत जाधव, हनिफ जरीवाला, फारुक रंगरेज, लकी खुबचंदानी, अण्णा दिघे, निर्मलाताई मालपाणी, भरत गारुडकर, दत्तात्रय राऊत, निलेश भांगरे, अजिम राजे, मुसद्दीक मेमन आदी यावेळी उपस्थित होते.
काळी फित लावून तहसील कार्यालयासमोर निदर्शने
नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाही़ उलटपक्षी या निर्णयाचा सामान्य जनतेला त्रास झाल्याचा आरोपकरून नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगर तहसील कार्यालयासमोर काळ्या फिती लावून जोरदार निदर्शने करण्यात आली. सरकारच्याविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला. आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नगर तालुकाध्यक्ष गहिनीनाथ दरेकर यांनी केले. आंदोलनात युवकचे प्रदेशउपाध्यक्ष कुमार वाकळे, गजेंद्र भांडवलकर,अशोक कोकाटे, आबासाहेब सोनवणे, पापाभाई पटेल, रोहिदास शिंदे आदींचा सहभाग होता.