अहमदनगर : जिल्हा परिषदेचा संपूर्ण स्वच्छता कक्ष आणि स्वच्छ पाणी मिशनच्या वतीने जिल्ह्यात वार्षिक कृतिआराखड्यानुसार शौचालय बांधकाम करण्यात येत आहे. यात प्रत्येक तालुक्यातून काही गावांची निवड करण्यात आली असून, त्या ठिकाणी शौचालय उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आराखड्यानुसार काम करण्यात पिछाडीवर असणाऱ्या तालुक्यांना नोटिसा बजाविण्यात येणार आहेत. जिल्हापरिषद संपूर्ण स्वच्छता कक्षाच्या वतीने शौचालय बांधणीचा वार्षिक कृतिआराखडा तयार करून तो केंद्र सरकार व राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. यात प्रत्येक तालुक्यातून काही गावांची निवड करण्यात आली असून, त्यानुसार शौचालय उभारणी करण्यात येत आहे. कार्यक्रमात राहुरी तालुका सर्वांत पिछाडीवर आहे. राहुरी खालोखाल शेवगाव, पारनेर, अकोले, जामखेड, कर्जत, पाथर्डी, नेवासा, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, नगर आणि श्रीगोंदा यांचा समावेश आहे. जिल्ह्यात शौचालय उभारणीत सर्वाधिक काम श्रीगोंदा तालुक्यात आहे. जिल्हा परिषदेने कृतिआराखड्यात ६६ हजार ६६६ गावांचे उद्दिष्ट ठेवले होते. त्या उद्दिष्टानुसार सध्या काम सुरू आहे. आराखड्यानुसार काम न करणाऱ्या तालुक्यांना नोटिसा देण्याचा निर्णय स्वच्छता कक्षाने घेतला आहे. आतापर्यंत सहा तालुक्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
सहा तालुक्यांना नोटिसा
By admin | Published: October 10, 2016 12:37 AM