अहमदनगर : नारायणडोह येथील इंग्रजी माध्यमाच्या सेंट मायकल स्कूलवर शिक्षण विभागाने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. शाळेला प्रथम मान्यता नाही, शाळेत विहीत अर्हताधारक शिक्षकांची नेमणूक नाही, तसेच अनेक बाबींची अनियमितता, शासकीय आदेशांचे उल्लंघन, आरटीई कायद्यांतर्गत अंमलबजावणीकडे टाळाटाळ यामुळे शाळेच्या मान्यतेचा प्रस्ताव नामंजूर करण्यासह शाळेला मिळालेले सीबीएसईसाठीचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे का पाठवण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेस पाठवली आहे.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रमाकांत काठमोरे यांनी १७ आॅगस्ट रोजी सेंट मायकल स्कूलच्या प्राचार्यांना पत्र देत हा खुलासा मागवला आहे. शाळेने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क तरतुदींचे उल्लंघन केले आहे. सन २०१६- १९ या तीन वर्षांत शाळेने आरटीईअंतर्गत द्यावयाच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पात्र विद्यार्थी अनुक्रमे २६,२०, २० असताना एकाही विद्यार्थ्यांस प्रवेश दिला नाही. सन २०१९-२० मध्ये आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी २१ विद्यार्थी पात्र असताना केवळ तिघांना प्रवेश दिला. त्यातही २ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर प्रवेश देण्यात आला.
तसेच २०२०-२१ मध्ये २२ विद्यार्थी पात्र असताना प्रारंभी एकही प्रवेश दिला नाही. पुन्हा गटशिक्षणाधिकाºयांनी पत्र
दिल्यानंतर केवळ २ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला.याशिवाय शालेय शुल्कासाठी अडवणूक केल्याच्या पालकांच्या लेखी तक्रारी आहेत. २५ टक्के प्रवेशाबाबत शिक्षणाधिकाºयांनी ६ जुलै २०२० रोजी आयोजित केलेल्या मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेला सेंट मायकलच्या प्राचार्या अनुपस्थित होत्या. यावरून शाळा २५ टक्के प्रवेश देण्याबाबत गंभीर नसल्याचे निदर्शनास येत आहे, तसेच शाळेकडून आरटीई कायद्यांतर्गत तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे शिक्षणाधिकाºयांनी पत्रात म्हटले आहे.