लोकमत न्यूज नेटवर्क
केडगाव : महानगरपालिकेची विविध करांची वर्षानुवर्षे थकबाकी थकवणाऱ्या केडगावमधील अडीच हजार मालमत्ताधारकांना केडगावमधील कर निरीक्षकांनी नोटिसा पाठवल्या आहेत. या थकबाकीदारांकडे १९ कोटींची थकबाकी असून, आता या प्रकरणांचा निर्णय २५ तारखेच्या लोकअदालतीत होणार असल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.
केडगावमध्ये एकूण १९ हजार मालमत्ताधारक आहेत. त्यातील अडीच हजार मालमत्ताधारकांकडे मनपाच्या विविध करांची १९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात शास्तीची रक्कम ७ कोटी ६२ लाख रुपये इतकी असून, २० हजार रुपयांपुढील थकबाकीच्या वसुलीसाठी मनपाने आता धडक कारवाई सुरू केली आहे.
केडगाव विभागप्रमुख व करनिरीक्षक सुखदेव गुंड यांनी या अडीच हजार थकबाकीदार मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली. या थकबाकीदारांचे प्रकरण लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी पाठवण्याचा प्रस्ताव मनपाने सादर केला असून, ही लोकअदालत २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. जे थकबाकीदार थकबाकीची रक्कम रोखीने भरतील त्यांना शास्तीची २५ टक्के रक्कम रोख भरावी लागणार आहे, तसेच त्यांना शास्तीची ७५ टक्के रक्कम माफ होणार आहे. लोकअदालतीपूर्वी या थकबाकीदारांना आपली थकबाकीची व शास्तीची रक्कम केडगावच्या विभागीय कार्यालयात भरण्याची सुविधा देण्यात आली आहे, असे थकबाकीदारांना बजावलेल्या नोटिशीत नमूद आहे.
..............
केडगावची सद्य:स्थिती
एकूण थकबाकी - १९ कोटी
शास्तीची रक्कम - ७ कोटी ६२ लाख
एकूण मालमत्ताधारक - १९ हजार
निवासी- १०६२७
मोकळे भूखंड - ७९५०
अनिवासी - ५९४
एकूण थकबाकीदार - २५००
............
केडगावमधील २० हजारांपुढील थकबाकी असलेल्या अडीच हजार मालमत्ताधारकांना आज वसुलीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या. यातील जे थकबाकीदार २५ सप्टेंबरच्या लोकअदालतीत किंवा त्यापूर्वी केडगाव कार्यालयात पूर्ण थकबाकी भरतील, त्यांना एकूण शास्तीत ७५ टक्के सूट देण्यात येणार आहे. उर्वरित २५ टक्के रक्कम मात्र त्यांना रोखीने भरावी लागणार आहे.
-सुखदेव गुंड, करनिरीक्षक मनपा, केडगाव विभाग