अहमदनगर : नगर शहरातील कुख्यात गुंड व उद्योजक करीम हुंडेकरी यांच्या अपहरण प्रकरणातील मास्टरमार्इंड अझहर मंजूर शेख याला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. तो मध्यप्रदेश राज्यातील पिंपरवाणी खवासा या खेडेगावात राहत होता. पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्याला ताब्यात घेतले.अझहर व त्याच्या साथीदारांनी येथील उद्योजक अब्दुल करीम सय्यद (हुंडेकरी) यांचे १८ नोव्हेंबर २०१९ रोजी नगर शहरातून अपहरण केले होते. अपहरणानंतर हुंडेकरी यांना जालना येथे नेऊन २५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते़ या घटनेनंतर पोलिसांनी अझहर व त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला होता. घटनेच्या दोन दिवसानंतर स्थानिक गुन्हे शाखेने अझहरचा साथीदार निहाल उर्फ बाबा मुशरफ शेख एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. अझहर मात्र पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांना माहिती मिळाली की, अझहर हा मध्यप्रेदश राज्यातील शिवनी या खेड्यात आहे. माहितीनुसार सहायक निरिक्षक शिषीरकुमार देशमुख, हेड कॉस्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक संतोष लोढे, दीपक शिंदे, रविंद्र कर्डिले, रविकिरण सोनटक्के, मच्छिंद्र बर्डे, सागर ससाणे, प्रकाश वाघ, राहुल सोळुंके यांच्या पथकाने शिवनी परिसरात जाऊन माहिती घेतली़. पिंपरवाणी हे गाव पेंच अभयारण्य परिसरात असल्याने अझहर हा दिवसभर जंगलात जाऊन राहत होता. रात्री तो गावात येत असे अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी वेशांतर करून दोन दिवस सापळा लावून अझहरला अटक केली़. आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अझहर याच्यावर गंभीर स्वरुपाचे १४ गुन्हे अझहर शेख याच्यावर कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प, संगमनेर आदी पोलीस ठाण्यात खून, दरोडा, मारहाण, विनयभंग, जिवे मारण्याचा प्रयत्न, आर्म अॅक्ट असे गंभीर स्वरुपाचे चौदा गुन्हे दाखल आहेत.
कुख्यात गुंड अझहर शेख अखेर जेरबंद; मध्यप्रदेशमधील खेड्यात लपला होता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 4:15 PM