अहमदनगर : नगर शहरात भरदिवसा लुटमार, दरोडे आणि मारहाण करणारा कुख्यात गुंड विजय ऊर्फ ढेब्या राजू पठारे याला जेरबंद करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे यांच्या पथकाने पठारे याच्यासह त्याचा साथीदार करण खंडू पाचारणे यांना पुणे परिसरातील लोणीकंद येथून रविवारी रात्री जेरबंद केले.
नगर शहरातून हद्दपारीची कारवाई झालेला विजय व त्याचा भाऊ अजय पठारे यांनी दोन महिन्यांपूर्वी नगर शहरात भरदिवसा दुकानदारांची लुटमार केली होती. त्यानंतर १९ मे रोजी विजय व त्याच्या साथीदारांनी सिद्धार्थनगर येथे दिनेश मनोहर पंडित यांच्यावर चाकूहल्ला करून त्यांना जखमी केले होते. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान विजय पठारे याचा पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून शोध घेत होते तो मात्र काही सापडत नव्हता. विजय व त्याचा साथीदार पाचरणे हे लोणीकंद परिसरात लपले असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. उपनिरीक्षक मेढे यांच्या पथकाने रात्रभर शोध घेऊन पठारे व पाचरणे यांच्या रविवारी रात्री मुसक्या आवळल्या. पाचरणे व पठारे यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान पठारे टोळीविरोधात तोफखाना पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाईसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील उपाधीक्षक विशाल ढुमे, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूरज मेढे, हेड कॉन्स्टेबल शकील सय्यद, पोलीस नाईक अविनाश वाकचौरे, वसीम पठान, अहमद इनामदार, सचिन जगताप, धीरज खंडागळे, प्रशांत राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.