शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या येथील कुख्यात सोन्या बेग याला शहर पोलिसांनी गुरुवारी जेरबंद केले. त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर, राहाता, संगमनेर येथे गंभीर स्वरुपाचे २५ गुन्हे दाखल आहेत.
दोन वर्षांपासून पोलिस बेग याच्या शोधात होते. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हा दाखल आहेत. शहरातील व्यापारी व नागरिकांना धमकावत तो दहशत निर्माण करत होता. बुधवारी भाजप कार्यकर्ता गणेश बिंगले याला बेग याने रस्त्यावर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी बिंगले याने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. शहरातील डावखर रस्त्यावरील घरी बेग येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सापळा रचण्यात आला. त्यात बेग याला पकडण्यात यश आले. खुनाचा प्रयत्न, लूटमार आदी गुन्हे त्याच्यावर दाखल होते.
पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे, शफीख शेख, रघुवीर कारखेले, बिरप्पा करमल, सोमनाथ गाडेकर, गौतम लगड, रमीजराजा अत्तार, गणेश गावडे, मच्छिंद्र कातखडे, अमोल गायकवाड यांनी ही कारवाई केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"