अहमदनगर : शहरातील नियोजित उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा खासदार दिलीप गांधी यांनी जाहीर केलेला १४ आॅक्टोबरचा मुहूर्त हुकल्यानंतर पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आता २९ आॅक्टोबर ही नवी तारीख जाहीर केली आहे. विकास कामाची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने टीका करणा-यांनी निश्चिंत राहावे, असे सांगून काँग्रेसच्या सत्ताकाळात काय दिवे लागले, असा सवाल पालकमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.खासदार दिलीप गांधी यांनी १४ आॅक्टोबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होईल, अशी तारीख जाहीर केली होती. मात्र त्यादिवशी भूमिपूजन न झाल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी खिल्ली उडविली होती. तसेच आता नगरकरांचा भूमिपूजनावर विश्वास राहिलेला नाही, अशी टीकाही केली होती. उड्डाणपुलाचा आराखडा तयार नसल्याने भूमिपूजनाऐवजी थेट लोकार्पण करण्याची मागणी तांबे यांनी केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही खासदारांवर चांगलेच संतापले असल्याची माहिती आहे. त्यामुळेच १४ आॅक्टोबरची तारीख जाहीर झाल्याचे खापर खासदार गांधी यांनी प्रसारमाध्यमांवर खापर फोडले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जाहीर केलेल्या नव्या तारखेकडे लक्ष लागले आहे.मंगळवारी काही पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना पालकमंत्र्यांनी २९ आॅक्टोबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले. १४ आॅक्टोबर ही तारीख निश्चित झाली होती, हे सत्य असल्याचे शिंदे म्हणाले. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे १४ आॅक्टोबरला कार्यक्रम झाला नाही. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग, शहरातील उड्डाणपूल व इतर विकास कामांचे भूमिपूजन एकाच दिवशी करण्याचे नियोजन आहे. पुलाचा डीपीआर बनवूनच या कामाचा प्रारंभ होणार असल्याचे ते म्हणाले. उलट टीका करणाºयांनी सत्तेत असताना काय केले, असा सवाल करीत अप्रत्यक्षपणे सत्यजित तांबे यांच्यावर निशाणा साधला.
सोशल मीडियावर उड्डाणपूल..
उड्डाणपुलाचे मुहूर्त हुकल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ उठला होता. दिवाळीनिमित्त शहरात मुलांकडून किल्ले तयार करण्यात येत आहेत, मात्र उड्डाणपूल कोणीच बांधत नसल्याची एक पोस्ट टीकाही सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. राजेंद्र गांधी यांनी तर ‘नगरच्या उड्डाणपुलावरून दिवाळीच्या शुभेच्छा’ अशी पोस्ट टाकताना त्यांनी उड्डाणपुलाचे छायाचित्रही दिले आहे. ‘आमचा पाठपुरावा चालू आहे, उड्डाणपूल तर होणारच’, असे उत्तर सत्यजित तांबे यांनी दिले आहे. ‘उड्डाणपूल नको, तर सर्वसामान्यांना हनुमान होण्याचा वर द्या’, अशी एक बोलकी प्रतिक्रिया आहे. ‘पुलाचा प्रश्न आता माध्यमांनीच उचलून धरला पाहिजे’, अशी अपेक्षा ऋषिकेश ताठे याने व्यक्त केली आहे.