अहमदनगर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एप्रिलमधील शुभमंगल रद्द करण्यात आले आहेत. मुहूर्त आणि गौण तिथी, अशा दोन मुहूर्तांवर अनेकांनी लग्नाचे बेत आखले होते. मात्र, ही वेळ सावधगिरी बाळगण्याची असल्याचे सांगत वर-वधू पक्षांनी एप्रिलमधील लग्नसमारंभ रद्द केले आहेत. त्यामुळे तब्बल ८० मंगल कार्यालयांतील आठशेच्या आसपास लग्नाच्या तारखा रद्द करण्यात आल्याचे मंगल कार्यालय मालकांना कळविण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या सावटामुळे मेमध्येही लग्नाच्या तारखा निश्चित करण्याबाबत सावधगिरी बाळगली जात आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नगर जिल्ह्यात रोज सरासरी दोन हजार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यात ५ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू झाला. लॉकडाऊनमध्येही ५० जणांच्या उपस्थितीत विवाह समारंभास परवानगी देण्यात आलेली आहे. यावेळी सर्व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करायचे आहे. त्यात अनेकांनी शनिवार, रविवारच्या तारखा आरक्षित केल्या होत्या. मात्र, या दोन्ही दिवशी लग्नसमारंभ करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन तारखांना होणारे साधारण तीनशेच्या आसपास लग्नतारखा रद्द झाल्याचे विविध मंगल कार्यालयांच्या मालकांनी सांगितले.
-------------
विवाह मुहूर्त (गौण व शुभ)
एप्रिल- १, ३, ५, ६, ७, १७, २२, २४, २५, २६, २८, २९, ३० (१३ मुहूर्त)
मे- १, २, ३, ४, ५, ८, १३, १५, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१ (१९ मुहूर्त)
जून- ४, ६, १३, १६, २०, २६, २७, २८ (१० मुहूर्त)
------------
नगर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेकांनी स्वत:हून लग्नाच्या तारखा रद्द केल्या आहेत. यामुळे व्यवसायाचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, कोरोनाची साखळी तोडणे ही प्राथमिक गरज आहे. नियमांचे पालन करूनही किंवा ५० लोकांमध्ये, विवाह समारंभ करायला अनेकांचा नकारच आहे.
-भगवान फुलसौंदर, मंगल कार्यालयाचे मालक
-------------
एप्रिलमध्ये पाच-सहा तारखा आरक्षित होत्या. मात्र, त्या रद्द झाल्या आहेत. त्यात १७, २४ व २५ रोजी येणारे मुहूर्त शनिवारी- रविवारी होते. मात्र, वीकेंड लॉकडाऊनमध्ये लग्नसमारंभांना परवानगी नसल्याने त्याही तारखा रद्द झाल्या आहेत. सर्व नियमांचे पालन करून समारंभ करण्याची आमची तयारी असली तरी वऱ्हाडी मंडळीची कोरोनाच्या काळात लग्नकार्य करण्याची मानसिकता नाही.
-दीनानाथ जाधव, मंगल कार्यालयाचे मालक
--------------
मंगल कार्यालयातील नियम
सोमवार ते शनिवार या लॉकडाऊनच्या काळात ५० लोकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ करता येईल.
मंगल कार्यालयाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
लसीकरण न झाल्यास त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगावे.
दोन्ही प्रमाणपत्रे नसल्यास १ हजार रुपये दंड व मंगल कार्यालयाच्या मालकास १० हजार रुपये दंड.
अपराधाची पुनरावृत्ती झाल्यास आस्थापना बंद करण्यात येईल.
------------------