राहुरी : तालुक्यात कोरोना लसीकरणाआधी आता कोविड अँटिजन चाचणी करण्यास प्रारंभ झाला आहे. तालुक्यातील मानोरी आरोग्य उपकेंद्र अंतर्गत ही मोहीम राबविण्यात येत आहे. रविवारी ५० जणांची कोरोना चाचणी करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
मानोरी येथील समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ. स्वाती देसले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवक सुनील पोंदे, आरोग्यसेविका सुनीता माने, आशासेविका वैशाली थोरात, स्वाती तनपुरे, सुनीता आढाव, मुक्ता पोटे, सरपंच आब्बास शेख, पोलीसपाटील भाऊराव आढाव, ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड, तलाठी राहुल कऱ्हाड यांनी पहिल्या दिवशी लोकांची टेस्ट करण्यासाठी परिश्रम घेतले. रविवारी दिवसभरात सुमारे दीडशे व्यक्तींना भ्रमणध्वनीद्वारे नोंदणी करून घेतली. नोंदणी झाल्यानंतर ५० व्यक्तींना मांजरी येथील आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठवले आहे. तीन दिवसांनी त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावरच निगेटिव्ह व्यक्तींनाच कोरोना लस दिली जाईल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
..........
मानोरी येथील मतदार यादीनुसार सकाळपासून गावातील कुटुंबप्रमुखांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यामधून सुमारे ५० व्यक्तींच्या तपासण्या पूर्ण केल्या आहेत. कोरोना लसीकरणाआधी केलेल्या तपासण्यांमुळे आता पूर्णपणे सुरक्षित वाटत आहे. त्यामुळे संक्रमित व्यक्तींपासून कोणालाही धोका होणार नाही. त्यामुळे ही प्रक्रिया सुलभ वाटते.
-स्वाती देसले, समुदाय वैद्यकीय अधिकारी
.....................
लसीकरणाआधी आता टेस्ट करायला मानोरी गावातून सुरुवात करण्यात आली आहे. तहसीलदार व आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आमची कमिटी काम करत आहे. सकाळपासून कमिटी व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत सुमारे दोनशे व्यक्तींना फोन करून मांजरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. त्यापैकी ५० व्यक्तींच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
- भाऊराव आढाव,
पोलीसपाटील, मानोरी