नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मिटके बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पद्माकर शिंपी, अशोक गाडेकर, नगरसेवक बाळासाहेब गांगड, रवी पाटील, राजेंद्र पवार, मुक्तार शाह, प्रकाश ढोकणे आदी उपस्थित होते.
संदीप मिटके म्हणाले, आता सोशल मीडियामुळे प्रत्येक नागरिक हा पत्रकार बनला आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ची मते मांडण्यासाठी माध्यम उपलब्ध झाले असून तो बातम्या प्रसारित करत आहे. मात्र असे असले तरी त्या बातमीची सत्यता पडताळण्यासाठी वर्तमानपत्रांचाच आधार घेतला जातो. याचाच अर्थ वर्तमानपत्रावर आजही समाजाचा विश्वास टिकून आहे. व्यावसायीक स्वरुप प्राप्त झाले असले तरी त्यात नवीन काही नाही. वर्तमानपत्रांच्या छपाईचा खर्च हा जाहिरातींच्या माध्यमातूनच भरून काढावा लागतो. पोलीस, राजकीय नेते आणि पत्रकार हे एकाच नाण्याच्या बाजू आहेत. सर्वांच्या कामामध्ये सारखेपणा आहे. मात्र दुर्दैवाने या तीनही प्रमुख घटकांमधील चांगली बाजू जनतेच्या समोर येत नाही. ब्रिटिशकालीन व्यवस्थेमुळे पोलिसांकडे स्वातंत्र्योत्तर काळातही जनतेचा विरोधी घटक समजून पाहिले जाते. प्रत्यक्षात मात्र पोलीस दलामध्ये ८० टक्के अधिकारी व कर्मचारी हे शेतकरी कुटुंबांतूनच आलेले आहेत. त्यामुळे जनतेमधील काही गैरसमज दूर होणे गरजेचे आहेत.
................
श्रीरामपुरात मी पुन्हा आलो
पंचायत समितीत २०१६ मध्ये गटविकास अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर मी पुन्हा येईन, असे कधीही म्हणालो नव्हतो. मात्र योगायोगाने श्रीरामपुरात पोलीस उपअधीक्षकपदी काम करण्याची संधी मिळाली असे मिटके यांनी सांगितले. त्याला उपस्थितांनी हसून दाद दिली.
-----------------