अकोले : तालुक्यातील आंबड गाव संपूर्ण शेतीशिवार जमीनीची 'ड्रोन'च्या मदतीने मोजणी सुरू आहे. शनिवारी राज्याचे जमाबंदी आयुक्त तथा भूमी अधिलेखचे संचालक एस.चोकलिंगम यांनी आंबड गावास भेट देवून मोजणी कामाच्या सूचना दिल्या. संपूर्ण गाव शिवार एकाचवेळी मोजणी करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग महसूल विभागाच्या मदतीने सुरु आहे. यामुळे गावातील बांधावरुन होणारी भांडणे संपुष्टात येण्यास मदत होईल, असे अपेक्षित असल्याचे मत एस.चोकलिंगम यांनी व्यक्त केले.
आंबड शिवारात एकूण १९६ सर्वेनंबर असून १ हजार ५६ हेक्टर व ३८ आर इतके गावशिवार क्षेत्र आहे. जवळपास बाराशे खातेदार शेतकरी आहेत. भूमी अभिलेखचे उपअधिक्षक यांच्यावर जबाबदारी निश्चित करुन ७ टिम तयार केल्या असून २७ अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मोजणी सुरू आहे.
गावातील बांधाचे भांडण २५ वर्षात कधी कोर्ट, कचेरीपर्यंत जावू दिले नाही. पण भविष्यात शेतीची भांडणे वाढण्याची शक्यता लक्षात घेवून गावाने संपूर्ण शिवार मोजण्याचा निर्णय केला. महसूलमंञी बाळासाहेब थोरात यांनी या अभिनव कल्पनेचे स्वागत करत सहकार्य केले. पुणे जिल्हा एका गावात असा प्रयोग राबवण्यात यश आले नाही. पण आंबड गावातील तरुणाईच्या पुढाकारातून हा प्रयोग यशस्वी होईल, असे माजी सरपंच गिरजाजी जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.