अकोले : राज्यात पाच महिन्यात १०९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आता कुणावर ३०२ दाखल करायचा? असा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल करीत ‘मला नाही आब्रू, मग कशाला’ असे आश्वासने न पाळणारे ‘फेकू सरकार’ घालविण्यासाठी राष्टÑवादी काँगेसच्या तरुणांनी कामाला लागावे, असे आवाहन करुन धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासींच्या आरक्षणास धक्का लागू देवू नका? असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवर्जून स्पष्ट केले.अकोले परिसरात शनिवारी औरंगपूर फाटा येथे तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. माजीमंत्री मधुकर पिचड, आमदार शशिकांत शिंदे, आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, मधुकर नवले, संग्राम कोते, राजेंद्र फाळके, दिलीप शिंदे, कपील पवार, गिरजाजी जाधव, संगीता शेटे, चंद्रकला धुमाळ व्यासपीठावर उपस्थित होते.देशात आणि राज्यात हुुकुमशाहीचे राज्य सुरु असल्याची टीका करीत मनुवादी विचाराचे सरकार नेस्तनाबूत करण्यासाठी शेतकºयांच्या मुलांनी सिध्द व्हावं अशी अपेक्षा आ.पवार यांनी व्यक्त केली. त्यांचे भाषण सुरु असताना एक कार्यकर्ता सभागृहात उभा राहून घोषणा देत असताना ‘खासदार-आमदरकीच बटण दाबेपर्यंत हा उत्साह टिकून ठेवा! नाही तर आमची पाठ फिरली की व्हा पसार..’ अशी मिश्किल टिपणी त्यांनी केली.सीताराम गायकर यांनी प्रास्ताविक तर यशवंत आभाळे यांनी सूत्रसंचालन केले. आ. शिंदे, आ. वैभव पिचड, मीनानाथ पांडे यांची भाषणे झाली. विकास शेटे यांनी आभार मानले. जेष्ठ नेते मधुकर नवले यांची राष्ट्रवादी किसान सभेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र आ.पवार यांचे हस्ते त्यांना यावेळी देण्यात आले.