अहमदनगर : येत्या नोव्हेंबरपासून शहरी भागात नवीन वीजजोडणी आणि नावात बदल या सुविधांसाठी केवळ आॅनलाईन अर्जच स्वीकारले जाणार आहेत. पारदर्शक व गतिमान ग्राहक सेवेसाठी महावितरणने हे पाऊल उचलले आहे.तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेऊन महावितरणने पुढाकार घेत नवीन वीजजोडणीसाठी विविध आॅनलाईन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यात मोबाईल अॅप, संकेतस्थळ, मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्र, हेल्पलाईन क्रमांक आदींचा समावेश आहे. उपलब्ध सुविधांचा अधिकाधिक वापर अपेक्षित होता व त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या होत्या. मात्र ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही या सुविधेचा लाभ घेऊन नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे समोर आले आहे.दुसरीकडे कार्यालयात येऊन आॅफलाईन अर्ज करणाºया ग्राहकांची संख्या वाढत आहे. या ग्राहकांना नवीन वीजजोडणी मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी मुख्य कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींचा आढावा घेतला असता स्थानिक कार्यालयात सादर झालेला ग्राहकाचा अर्ज प्रणालीत भरून पुढील प्रक्रिया पार पाडण्यात उशीर होत असल्याने अनेक अर्ज प्रलंबित असल्याचे मुख्य कार्यालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे महावितरणच्या शहरी भागात नवीन वीजजोडणीसाठी आॅफलाईन अर्ज स्वीकारणे बंद करून नोव्हेंबरच्या प्रारंभापासून केवळ आॅनलाईन अर्जच स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आॅनलाईन अर्जामुळे मानवी हस्तक्षेप टाळण्यासोबतच ग्राहकांना पारदर्शक व गतिमान सेवा देता येणार आहे.
आता आॅनलाईन अर्जावरच वीजजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:42 AM