श्रीरामपूर : चित्रपटांच्या निर्मितीपेक्षा विपणनावर सध्या मोठा खर्च होतो आहे. त्यामुळे प्रामाणिक आणि होतकरू मंडळींनी थेट इंटरनेटवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा मार्ग निवडला आहे. दिग्दर्शक व निर्मात्यांची मध्यस्थांकडून होणारी लूट यातून थांबल्याचा विश्वास राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक नितीन चंद्रा यांनी केले.श्रीरामपूर येथे मुलांकरिता विनामूल्य चित्रपट निर्मितीची कार्यशाळा झाली. कार्यशाळेनंतर शुक्रवारी रात्री त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चंद्रा हे मूळचे बिहार येथील असून त्यांच्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन बिहार’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. यावेळी पानसिंग तोमर, फिल्मिस्तान, सोच लो या चित्रपटांत भूमिका साकारणारे अभिनेता रवी भूषण, संजय खानझोडे, विशाल शिंदे उपस्थित होते.सध्या मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटांना प्रदर्शनासाठी अडचणी येत आहेत. या मागे मोठे अर्थकारण दडलेले असते. चित्रपट ही केवळ कला राहिलेली नाही. ती एक मोठी बाजारपेठ आहे हे ध्यानात घ्यावे लागेल. निव्वळ नफ्याचा हेतू डोळ्यासमोर ठेऊन अनेक व्यावसायिक यात गुंतलेले आहेत, असे चंद्रा म्हणाले. हा खर्च परवडत नसल्याने अनेक दिग्दर्शक थेट इंटरनेटवर चित्रपट प्रदर्शित करीत आहेत. त्याला कोट्यवधींच्या संख्येने व जगभरातील प्रेक्षकवर्ग उपलब्ध झाला आहे. पुढील काही दिवसांत भारतात असे पाच चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असल्याचे चंद्रा यांनी सांगितले.मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहणे ही बाब महागडी बनली आहे. तेथे रसिकांकडे ग्राहक व खरेदीदार म्हणून पाहिले जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून अधिकाधिक चित्रपट बनले पाहिजेत, त्यांच्यावर चित्रपटांचा मोठा प्रभाव असल्याचे चंद्रा म्हणाले.
आता इंटरनेटवर चित्रपटांचे प्रदर्शन :नितीन चंद्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 5:32 PM