अहमदनगर : गाय, म्हैस या गाभण आहेत किंवा नाही, याबाबत शेतक-यांची अनेकदा फसवणूक केली जाते़ शेतक-यांची ही फसवणूक टाळण्यासाठी व गाभण जनावरांच्या पोटातील गर्भ नेमका किती दिवसांचा आहे, याची इत्यंभूत तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने लवकरच सोनोग्राफी मशीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे़. या मशीनद्वारे शेतक-यांना फक्त दोन रुपयांमध्ये जनावरांची सोनोग्राफी करता येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या सभागृहात गुरुवारी (दि़ १२) पशुसंवर्धन विभागाच्यावतीने विषबाधेत मृत झालेल्या जनावरांच्या आर्थिक मदतीचे धनादेश गडाख यांच्या हस्ते पशुपालकांना प्रदान करण्यात आले. यावेळी सदस्य राजेश परजणे, शरद नवले, संध्या आठरे, सोनाली रोहमारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ सुनील तुंबारे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील ज्या शेतक-यांची जनावरे विषबाधेने मृत झाली आहेत, त्या शेतक-यांना आर्थिक मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने १० लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी ८ लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण शेतक-यांना करण्यात आले. सुमारे ८१ शेतक-यांना गुरुवारी दुस-या टप्प्यातील मदतीचे धनादेश सुपुर्द करण्यात आले. यावेळी गडाख म्हणाले, मी देखील शेतकरी आहे. त्यामुळे एक जनावर दगावले तर शेतक-यांचे किती नुकसान होते, हे मला माहिती आहे. त्यामुळे शेतक-यांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेने ही योजना सुरु केली आहे. त्याशिवाय शेतक-यांच्या मागणीप्रमाणे काऊ लिफ्टींग मशिन, दूध काढणी यंत्र, मुरघास पिशव्या, जनावरांसाठी एक्स-रे मशीन या योजना भविष्यात राबविण्यात येणार आहेत.
...आता दोन रुपयात जनावरांची सोनोग्राफी; पशुसंवर्धन विभागाची महत्वाकांक्षी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 6:19 PM