अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी ६५४ रुग्ण आढळून आले, तर ७६५ जणांना घरी सोडण्यात आले. दुपारच्या वेळी सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ९८५ इतकी होती. मात्र, बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने शनिवारी दुपारनंतर सक्रिय रुग्णांची संख्या घटून ती ४ हजार ८७१ इतकी झाली. दरम्यान, २४ तासांत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३८० आणि अँटिजन चाचणीत १८० रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (२२५), संगमनेर (६९), श्रीरामपूर (५५), कोपरगाव (५३), राहाता (५०), पारनेर (३८), नगर ग्रामीण (३३), शेवगाव (२१), जामखेड (१८), अकोले (१८), पाथर्डी (१७), कर्जत (१७), राहुरी (१५), नेवासा (१४), परजिल्हा (१३), कन्टोन्मेंट बोर्ड (६), श्रीगोंदा (२) येथील रुग्णांचा समावेश आहे.
--------------
कोरोनाची स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : ८३,५०४
उपचार सुरू असलेले रुग्ण : ४,८७१
मृत्यू : १,१९२
एकूण रुग्णसंख्या : ८९,५६७
-------------
...तर लॉकडाऊन करावा लागेल -थोरात
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून कोरोनाचा आढावा घेतला, तसेच जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांनी मास्क वापरावा, तसेच नियमांचे पालन करावे. मास्क न घालता नागरिक फिरत असतील, तर नगर जिल्ह्यात लॉकडाऊन करावा लागेल, असा इशाराच थोरात यांनी दिला. याबाबत थोरात यांनी काँग्रेसच्या बैठकीतही मास्क न वापरणाऱ्या कार्यकर्त्यांना समज दिली.