संगमनेर : शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमांकडे पाहण्याची नकारात्मकता सध्या बदलली असली तरी डीएड अभ्यासक्रमाच्या तुलनेत बीएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढली आहे. राज्यात बीएड महाविद्यालयाची संख्या गेल्या वर्षी ४९६ इतकी होती. राज्यभरातील बीएड महाविद्यालयांमध्ये यंदाच्या वर्षी ३२ हजारपेक्षा अधिक जागांसाठी पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच ७६ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.
शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम तज्ज्ञ, शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक राजू शेख यांनी याबाबत माहिती दिली. राज्यातील शिक्षक सेवकांची पदे भरण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरती संदर्भात कार्यवाही सुरू केल्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो आहे. गेल्या वर्षी बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ४६ हजार ८१७ इतके अर्ज आले होते. त्यापैकी ४३ हजार ९८३ अर्ज स्वीकारले गेले. तर ३९ हजार ८३५ अर्ज मंजूर करण्यात आले होते. गेल्या वर्षी बीएड महाविद्यालयांची संख्या ४९६ इतकी होती. या महाविद्यालयांतील निर्धारित जागांची संख्या ३२ हजार २९० इतकी असताना २९ हजार ५३३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.
शिक्षक प्रशिक्षणासाठी सर्वप्रथम सीईटी देणे बंधनकारक आहे. शिक्षक प्रशिक्षणासाठी असलेल्या परीक्षेसाठी यंदा बीएड जनरल स्पेशल अभ्यासक्रमासाठी ७६ हजारपेक्षा अधिक प्रवेश परीक्षा अर्ज भरले गेले आहेत. तसेच एमएड अभ्यासक्रमासाठी ३ हजार ९७४ पेक्षा अधिक, बीएड, एम.एड. या संयुक्त अभ्यासक्रमासाठी १ हजार ५०७, तर चार वर्षीय बीएड अभ्यासक्रमासाठी ४ हजार ९०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. एमएड व चार वर्षीय बीएड शिक्षक प्रशिक्षणाची महाविद्यालये तुलनेने राज्यात कमी आहेत.
सीईटी परीक्षेसाठी आवेदन भरणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वात अधिक पसंती दोन वर्षीय बीएड जनरल अभ्यासक्रमासाठी नोंदवण्यात आली आहे. पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा घेतली जाऊन गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे.
-------------
सहा हजार १०० पदे भरली जाणार
राज्यात सुमारे सहा हजार १०० शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदांसाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करण्यात येणार आहे. यामुळे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे प्राध्यापक शेख यांनी सांगितले.
--------------
महाराष्ट्रात दोन वर्षांच्या बीएड अभ्यासक्रमासाठी सीईटी सेलकडे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट असल्याचे नोंदीवरून लक्षात येते. गेल्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नव्हता, अशा विद्यार्थ्यांच्या संख्येत या वर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे.
डॉ. भालचंद्र भावे, प्राचार्य, शिक्षण शास्त्र महाविद्यालय, संगमनेर
-------------
२०११ साली डीएड अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र, घेतलेल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने नोकरी अजूनही मिळालेली नाही. शासनाच्या शिक्षण भरतीची प्रक्रिया प्रभावी नसल्याकारणाने माझ्यासारखे अनेक डीएड प्रशिक्षण पूर्ण केलेले तरुण बेरोजगार आहेत. अनेक जण नोकरीच्या शोधात आहेत. मिळेल ते काम करण्याची वेळ अनेकांवर आहे.
- ज्ञानेश्वर शिंदे, रा. संगमनेर
-------------
star 1160