शेवगाव : तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने घट होत असून तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. शेवगावकरांसाठी ही दिलासादायक बातमी असली तरीही काही गावांत सक्रिय रुग्ण असल्याने आगामी काही महिने नागरिकांना नियम पाळून काळजी घ्यावी लागणार आहे.
तालुक्यातील ४९ गावांतील कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आली असून ती गावे कोरोनामुक्त झाली आहेत. शेवगाव शहरासह ६४ गावांत कमी-जास्त प्रमाणात सक्रिय रुग्ण आहेत. शेवगाव शहरात सर्वाधिक ६० तर दहिगावने १६, भावी निमगाव १२, आव्हाणे व भातकुडगाव प्रत्येकी १० रुग्ण आहेत. राजणी ९, बोधेगाव, नजीक बाभूळगाव प्रत्येकी ७, हातगाव ६ तर इतर आठ गावांत प्रत्येकी ५, सहा गावांत प्रत्येकी ४, तेरा गावांत प्रत्येकी ३, नऊ गावांत प्रत्येकी २, तर उर्वरित १९ गावांतील प्रत्येकी १ रुग्ण उपचार घेत आहे.
तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच शेवगाव व बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत झालेल्या १ हजार ९६४ शिबिरांमध्ये ९८ हजार ३९२ जणांनी पहिला तर ३५ हजार ७०३ नागरिकांनी लसीचा पहिला व दुसरा डोस घेतला आहे. एकूण १ लाख ३४ हजार ९५ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.
..........
तालुक्यातील ४९ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तालुक्यातून कोरोना महामारी हद्दपार करून आपले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी, निकषात बसणाऱ्या ज्या नागरिकांचे लसीकरण राहिले आहे, त्यांनी लसीकरण करून घ्यावे. सध्या मोठ्या प्रमाणात लसीचे डोस शासन स्तरावरून उपलब्ध होत आहेत.
- डॉ. संकल्प लोणकर, तालुका आरोग्य अधिकारी
...........
लसींचे डोस राहतात शिल्लक
सुरुवातीच्या काळात लसीसंदर्भात असलेल्या गैरसमजामुळे अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर वाढती रुग्णसंख्या, लसीकरणाबाबत झालेली जागृती यामुळे मधल्या काळात तालुक्यातील लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होऊन, लसीचा तुटवडा जाणवत होता. सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. मात्र त्या तुलनेत लसीकरणासाठी नागरिक येत नाहीत. त्यामुळे लसींचे डोस शिल्लक राहत असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.