लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोना होऊन गेला. मात्र, म्युकरमायकोसिस या नव्या आजाराने रुग्णांचा पिच्छा सोडला नाही. जिल्ह्यात २३९ जणांना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने घेरले. कोरोनातून बरे होऊनही म्युकरमायकोसिसमुळे २० जणांना त्यांचे डोळे कायमचे गमवावे लागले आहेत. या बुरशीजन्य आजाराची सध्या जिल्ह्यात तीव्रता कमी झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराच्या संख्येत अधिक वाढ झाली. अधिक काळ आयसीयूमध्ये उपचार घेणे, स्टेरॉईडचा वापर करणे, ऑक्सिजनच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉईडयुक्त औषधांचे सेवन करणे यामुळे म्युकरमायकोसिसच्या रुग्ण संख्येत वाढ झाली होती. मधुमेह, तसेच इतर गंभीर आजार असलेल्या आणि कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आजाराचा गंभीर धोका होता.
-------------
९७- म्युकरमायकोसिसचे रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत
१९- जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा मृत्यू झाला
------------
औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध
म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या रुग्णांवर प्राथमिक अवस्थेत उपचार केल्यास तो लवकर बरा होतो. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना एम्फोटिरीसिन-बी हे इंजेक्शन दिले जाते.
एम्फोटिरिसिन-बी हे इंजेक्शन महागडे असून सुरुवातीला या इंजेक्शनचा आणि त्यावरील औषध गोळ्यांचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला होता. सध्या जिल्हा रुग्णालयातून या इंजेक्शनचे वाटप होत असून दररोज किमान ११० इंजेक्शन दिली जात असून त्याचा ७० रुग्णांना लाभ होत आहे. आठवडाभरात रुग्णांना १०९३ इंजेक्शन देण्यात आली.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत या आजारावर उपचार करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे.
-------------------
जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे २३९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील १२३ रुग्ण बरे झाले आहेत, तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ९७ जणांवर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात इंजेक्शन आणि औषधांचा साठा उपलब्ध आहे.
-डॉ. दादासाहेब साळुंखे, जिल्हा साथरोग अधिकारी
--------------
ही आहेत म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे
म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून कोरोनातून बरे झालेल्या तसेच मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांना या आजाराची लागण अधिक होते. या आजाराचा शिरकाव नाकावाटे होत असून सायनस होऊन पुढे डोळ्यात आणि मेंदूपर्यंत पोहोचतो. यामुळे बरेचदा डोळा आणि जबडासुद्धा काढावा लागतो. ओठ, नाक, जबड्याला प्रामुख्याने या आजाराचा संसर्ग होत असतो.
-----------
ही आहेत लक्षणे
डोळे दुखणे, डोळ्यांच्या बाजुला लाली येणे, सूज येणे, ताप येणे, डोके दुखणे, खोकला, दात, हिरड्या दुखणे, दात ढिले होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे, रक्ताची उलटी होणे व मानसिक स्थितीवर परिणाम होणे ही म्युकरमायकोसिसची लक्षणे आहेत. त्यामुळे ही लक्षणे दिसताच त्वरित जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा.
------------
शस्त्रक्रिया आणि डोळे गेले
म्युकरमायकोसिस या आजारामुळे २० टक्के रुग्णांचे डोळे काढून टाकावे लागले. बुरशीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे शस्त्रक्रिया झाल्या तरी रुग्णांचे डोळे वाचवता आले नाहीत. जिल्ह्यात १२३ रुग्ण बरे झाले. त्यातील २० पेक्षा जास्त जणांचे डोळे निकामी झाल्याचे जिल्हा रुग्णालयात उपचार करणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितले.
------------
ही घ्या काळजी
रक्तातील साखरेची एचबीएवनसीची तपासणी, रक्तातील साखरेवर काटेकोरपणे नियंत्रण, कोविडनंतर रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह यांचे निरीक्षण करा. स्टेरॉईडचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करा. घरी ऑक्सिजन घेतला असल्यास तो निर्जंतूक पाण्याचा वापर करा आणि ॲन्टीबायोटिक्स व ॲन्टिफंगल औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. या आजाराची लक्षणे दिसताच त्वरित उपचार करा.