श्रीरामपूर : कोरोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षी केजी व नर्सरीतील विद्यार्थी बराच काळ शाळेत जाऊ शकले नाहीत. नव्या शैक्षणिक वर्षातही मुलांना शाळेचे दर्शन होते की नाही हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे शहरातील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
श्रीरामपूर शहर तसेच बेलापूर व परिसरामध्ये केजी व नर्सरीचा समावेश असलेल्या सुमारे २० शाळा आहेत. तेथील पाच हजार विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक भवितव्य अंधारमय झाले आहे.
शैक्षणिक संस्थांसमोरही कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेक नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. प्रचंड अशा आर्थिक अडचणींना संस्थांना तोंड द्यावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे शाळेतील शिक्षक, मावशी, स्कूल बस चालक, जनरल स्टोअर्स व्यावसायिक, कापड दुकानदार यांचेही भवितव्य टांगणीला लागले आहे. विशेषतः वाहनचालकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे.
सरकारने कोरोना काळात शैक्षणिक शुल्क आकारणी संबंधी काढलेले आदेश आणि शाळांचे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे २५ टक्के मोफत प्रवेशाचे रखडलेले अनुदान यामुळे संस्थाचालक कात्रीत सापडले आहेत.
-----
वर्षभर कुलूप; यंदा?
अनेकदा सवंग लोकप्रियतेसाठी सरकारकडून काही निर्णय घेतले जातात. लॉकडाऊन काळात शैक्षणिक शुल्क माफीतून आर्थिक दृष्ट्या सक्षम पालकांना खरे तर वगळायला हवे होते. मात्र शिक्षण संस्था चालकांची एक खराब प्रतिमा याकाळात तयार केली गेली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नजरेत शिक्षक आणि शाळा याविषयी नकारात्मक भावना रुजण्याचा धोका आहे.
संदीप कोयटे,
समता इंटरनॅशनल.
-----
पुढील काळात विद्यार्थ्यांसाठी जर कोरोना प्रतिबंधक लस निर्माण झाली, तर प्राधान्याने लसीकरण करावे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष पूर्ण क्षमतेने सुरू करता येईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान त्यामुळे टाळता येईल.
रतन सेठी,
मॉडेल इंग्लिश स्कूल
----
एका शैक्षणिक संस्थेच्या बळावर हजारो लोकांचा प्रपंच उभा राहतो. मात्र कोरोना संकटामुळे या सर्वांसमोर अभूतपूर्व असे संकट उभे राहिले आहे. शैक्षणिक वर्ष बंद राहिल्याने लहान मुलांचीही चिडचिड होत आहे. मात्र त्यांच्या आरोग्याला पहिले प्राधान्य द्यावे लागते. लवकरच ही कोंडी फुटावी अशी अपेक्षा आहे.
मंजुश्री मुरकुटे,
अशोक शिक्षण संस्था.
-----
पालकही परेशान
शालेय जीवनात लहान मुलांचा जो दिनक्रम होता, तो आता विस्कळीत झाला आहे. त्यांना खेळायला संधी मिळत नाही. त्यामुळे जेवण, झोप यावरही विपरीत परिणाम झाला आहे.
अभिषेक खंडागळे, पालक.
-----
लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून घरामध्ये लहान मुलांना हाताळणे कठीण बनले आहे. मुलांना घरच्या डॉक्टरचा गुण येत नाही. त्यांचं लक्ष केंद्रित होत नाहीत. ते घराबाहेर पडण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. हे सर्व आव्हानात्मक आहे.
मधुरा कुंदे, श्रीरामपूर.
----