नगरच्या हौशी रंगभूमीवर १९८८ ते आजतागायत अथक, अविरत आणि यशस्वी वाटचाल करणारी नाट्य संस्था म्हणजे सप्तरंग थियटर्स आणि या संस्थेचे अध्यक्ष आहेत लेखक, दिग्दर्शक, अभिनेते श्याम वसंत शिंदे. एखादी नाट्य संस्था सुरु करणे, ती स्पर्धात्मक वातावरणात टिकवणे आणि अखंड यशस्वी वाटचाल सुरु ठेवणे, म्हणावे तितके सोपे नाही. त्यातल्या त्यात हौशी रंगभूमीवर तर नक्कीच नाही. सतत नाविन्याचा ध्यास, विविध प्रयोग करायचे धाडस आणि आपली एक स्वतंत्र विचारधारा घेऊन चालणारे श्याम शिंदे म्हणूनच आपला वेगळा मार्ग राखून वाटचाल करताना दिसतात.नाटक, मालिका, सिनेमा या चढत्या क्रमाने वाटचाल म्हणजे यश असा समज अनेकांचा कलाकारांकडे पहाण्याचा मिळतो. कदाचित प्रसिद्धी, पैसा आणि स्टारडम या त्यांच्या यशाच्या व्याख्या असाव्यात. मराठी हौशी रंगभूमी आणि त्यावरील कला जीवंत ठेवणाऱ्या असंख्य संस्था त्यातील अगणित कलाकार तंत्रज्ञ हे खरे कलेचे पाईक आहेत, असे मला नेहमी वाटते. नाटक ही जीवंत कला आहे. हा प्रवास खडतर आहे. पण यातून तयार होणारा कलाकार अस्सल बावनकशी सोने असते.लहान असताना गावाकडे जत्रेनिमित्त सोंग घेण्याचे कार्यक्रम होत़ ते पाहून दुसºया दिवसापासून खोटे धनुष्यबाण, तलवार तयार करून त्या सोंगाची नक्कल करायची त्यांनाआवड लागली आणि पुढे छंदच जडला़ महाविद्यालयात शिकत असताना १९८५ साली जेष्ठ अभिनेते बाळकृष्ण ओतारी यांनी दिग्दर्शित केलेल्या वस्त्रहरण या नाटकात त्यांनी प्रथम भूमिका केली आणि त्यांचा प्रवास महाविद्यालयीन स्पर्धांतून सलग तीन वर्ष स्वत: लेखन आणि दिग्दर्शन करून त्यांनी आत्मविश्वसाने पुढे नेला.१९८६ साली त्यांनी स्वत:ची सप्तरंग ही नाट्य संस्था स्थापन केली़ १९८८ ते २०१७ पर्यंत सलग ३० वर्ष ‘मृगजळ, सूर्योदय, भोवरा, छन छन छन, खोल खोल पाणी, मन धुव्वाधार, थँक्यू मिस्टर ग्लॅड, नीरो, हमीदाबाईची कोठी, रंग उमलत्या मनाचे, डॉ. हुद्दार, हातचा एक, अंदमान, कोलाज, तर्पण, मृत्युछाया, याचक, तीर्थरूप चिरंजीव, अग्निवेश, एक चॉकलेट प्रेमाचे, उंच माझा झोका गं, तप्त दाही दिशा, मथूरेचा बाजार, सिस्टीम क्रॅश, तृष्णा, मन वैशाखी डोळे श्रावण, फक्त तुझी जर दगडी भुवई, मानशीचा शिल्पकार तो, अखेरची रात्र’ या मराठी नाटकांचे तर ‘बाकी इतिहास, भवंर, अंदमान, तर्पण, तप्त दसों दिशाएँ, याचक २, मृत्युछाया, तृष्णा, झूला झूले ऊंचे गगनमे, सिस्टीम क्रॅश, कोसा तुम्हे लाखो बार, शिल्पायन’ या हिंदी नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले़ काही नाटकांमध्ये भूमिकाही केल्या़ यासह ‘जननी जन्मभूमिश्च, लास्ट बेंच, चम चम चमको, जाईच्या कळ्या, सरणार कधी तम?, अनाथ आम्ही तुझी, फुटबॉल आणि परी, हसरे दु:ख, सर तुम्ही गुरुजी व्हा, ओम मित्राय नम:, एलियन्स द ग्रेट’ या बाल नाटकांची निर्मिती केली.वरील नाटकांना राज्य नाट्यस्पर्धेसह विविध स्पर्धांमधून दिग्दर्शन, अभिनय, प्रकाश योजना, नेपथ्य या विभागात एकूण १४८ परितोषिके मिळाली आहेत. तर एकांकिकांना महाराष्ट्रातील विविध स्पर्धेत अनेक परितोषिके मिळाली आहेत. महाविद्यालयात येईपर्यंत कधीही रंगमंचावर न आलेले श्याम शिंदे केवळ आवड आणि जिद्द या गुणावर आज इतके यश मिळवू शकले. मुलांची आवड आणि यश पाहून वडील वसंत शिंदे यांनी श्याम यांना घरातील मोठा हॉल नाटकासाठी आणि व्हिडियो व्यावसयासाठी दिला, हे त्यांना मोठे प्रोत्साहन होते. नाटकाने माणूस सुसंस्कृत होतो आणि शिक्षणाने प्रगल्भ! म्हणून त्यांनी मुलगा श्रेयस याचे ११ वीचे एडमिशन घेताना स्वत:चेही वयाच्या ४४ व्या वर्षी मास्टर कोर्ससाठी एकाच महाविद्यालयात (न्यू आर्ट्स) एडमिशन घेतले. शिक्षणाला वयाचे बंधन नसते, असे त्यांचे मत आहे. त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात डिप्लोमा इन जर्नलिझम तसेच डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स (औरंगाबाद), मास्टर इन कम्युनिकेशनची पदवी व सेट-नेट असे शिक्षण घेतले़ आता लघूपटांतून मांडला जाणारा सामाजिक आशय या विषयावर ते पीएच़डी. करीत आहेत़अहमदनगर जिल्ह्यातील कलाकारांनी प्रगती करावी, शास्त्रोक्त ज्ञान मिळवावे आणि आपल्या कलेसंदर्भात सातत्य ठेवावे, असे त्यांना वाटते. म्हणून त्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी नाट्य आणि लघूपट कार्यशाळेचे आयोजन केले आहे. अहमदनगर फिल्म अँड टेलीव्हिजन इंन्स्टट्यूटचे ते अध्यक्ष आहेत़ श्याम शिंदे हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखेचे कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांच्या सप्तरंग संस्थेतून पुढे गेलेले अनेक कलाकार मालिका, चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत.सप्तरंग थियटर्सच्या वाटचालीत सुधीर देशपांडे, सुनील तरटे, प्रशांत कांबळे या मित्रांचे आणि पत्नी कुंदा शिंदे यांच्यासह अनेकांचे पाठबळ आणि सहकार्य मिळाले़ राज्य नाट्य स्पर्धा (मराठी, हिंदी) आणि बाल राज्य नाट्य स्पर्धेत प्राथमिक व अंतिम फेरीत पारितोषिक पटकावणारी सप्तरंग ही जिल्ह्यातील एकमेव संस्था असावी. वडील वसंत शिंदे आई मीनाक्षी, बंधू नंदेश यांनी कायम प्रोत्साहन दिले़ मुलगा उत्तम क्रिकेटपटू आहे तर मुलगी आकांक्षा माझा कलेचा वारसा पुढे नेते आहे़ तिची ललित कला केंद्र येथे निवड झाली असून ती उत्तम अभिनेत्री आहे. जेष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण ओतारी हे गुरुस्थानी आहेत़ नाटकामुळे मी समृद्ध व समाधानी आहे, असे श्याम शिंदे सांगतात.लेखक - शशिकांत नजान