हौशी रंगभूमिवर शिकण्याची जिद्द असावी लागते, तशी सहनशीलताही गरजेची आहे. हौस या स्तरावर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ही चळवळ व्यापक असली तरी प्रसिद्धी आणि अर्थार्जन याबाबत फार काही पदरी पडत नाही. गेली २५ वर्षे अनेक नट आणि त्या पेक्षा जास्त बोलट मी पाहिले आहेत. अभिनय, समर्पण, श्रध्दा आणि परिश्रम या बाबतीत ते कुठेही कमी नव्हते पण यश मिळायला त्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागली. आज हे कलाकार परिपूर्ण आहेत कारण त्यांची रंगभूमिशी असलेली निष्ठा ही निरपेक्ष आहे. याच वर्गात ज्यांचे नाव येते त्या म्हणजे कु. विद्या जोशी.नगर महाविद्यालयात २००२ साली बहीण संध्या पावसे या नाटकात काम करायच्या त्यांच्या आग्रहाखातर विद्या यांनी भूमिका केली. येथून त्यांच्या नाट्य प्रवासाला सुरवात झाली. नाटकांची आवड निर्माण झाली, पण घरातून प्रचंड विरोध होता. डॉन बॉस्को संस्थेच्या वतीने मी नाटक दिग्दर्शित करीत होतो. विद्या यांची पहिली भेट तिथेच झाली. आवड असणे आणि नाटक तंत्रशुद्ध पद्धतीने आत्मसात करणे यात मोठा फरक आहे. रंगभूमीवर अभिनेत्री म्हणून कसे उभे राहायचे हे सांगताना मी कित्येकदा विद्या यांच्या पायावर छडीने मारले तेव्हा असे वाटायचे आता विद्या तालमीला येणार नाही. परंतुु, दुसऱ्याच दिवशी अधिक सराव करून त्या तालमीला हजर असायच्या.नाटकात काम करायला नाट्य संस्था हवी असते. त्यात नवीन कलाकारांना अनेक गोष्टी माहीत नसतात. काही मुलेमुली एकत्र येऊन नाटक सादर करायची. त्यात येणारा खर्च सर्वांमध्ये विभागला जायचा. ते पैसे कुठून द्यायचे? कारण घरातून विरोध. त्यात पैसे मागणे म्हणजे नाटक बंद होणार. या द्विधा मनस्थितीतून विद्या यांनी मार्ग काढला. शिवणकाम करून बचत केलेले पैसे त्या नाटकासाठी देत असत. शिवण केलेले कपडे त्या सायकलवर भिंगार ते कापड बाजार नगर येथे पोहोच करताना मी अनेकदा पाहिले आहे. इतके करूनही तालमीवरून घरी जायला उशीर झाला की बोलणे खावे लगायचे. कधी कधी मार सहन केला पण त्यांनी जिद्द सोडली नाही. म्हणून आज ‘पेइंग गेस्ट’, ‘लव्ह बडर््स’, ‘लफडं लाखाचं’, ‘वृंदावन’, ‘अंकुर’, ‘एप्रिल फूल’, ‘राजा वक्रपाद’, ‘मारूतीचा कौल’, ‘सोबत’, ‘न उमललेले दिवस’, ‘मसीहा’, ‘आय बिगिनिंग’ या नाटकात आणि ‘दोन नकार’, ‘कामवाली बाई डॉट कॉम’, ‘विळखा’, ‘मी कोण’, ‘अवघाची रंग एक झाला’, या एकांकिकामध्ये त्यांनी अतिशय मनापासून आणि लक्षवेधी भूमिका साकारल्या. यासह १६ लघुपट, क्राइम डायरी मालिकेच्या १० भागात निगेटिव्ह (नकारात्मक) भूमिका केल्या. या निगेटिव्ह भूमिकांमुळे घरातून आणि समाजातून नावे ठेवली गेली बोलणे खावे लागले. विद्या यांच्यात एक लेखिका आणि दिग्दर्शिका दडलेल्या आहेत. आजपर्यंत त्यांना ‘स्वप्नचिया गावा’, ‘एक हुंदका दाटलेला’, ‘मी कोण?’, ‘खेळ कल्पनांचा’, ‘फाउल प्ले’, ‘आमच्या सारखे आम्हीच’ या एकांकिकांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट लेखिका आणि दिग्दर्शिका म्हणून पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी १५ एकांकिका लिहिल्या आहेत.महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या कांकरिया करंडक राज्यस्तरीय बाल एकांकिका स्पर्धेत विद्या गेली १९ वर्षे आपला संघ घेऊन सहभागी होतात. ही बाब महत्वाची आहे. कारण बालरंगभूमी ही हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीचा पाया आहे. विद्या यांनी घडवलेले बाल कलाकार पुढे हौशी, व्यावसायिक नाटकात, छोट्या पडद्यावर झळकले आहेत. आकाशवाणी नगर केंद्रावर त्यांची बालनाट्य प्रसारित झाली आहेत. बहीण संध्या आणि विद्या यांचे एक नाटक पाहायला घरातील सर्वजण आले होते. नाटक पाहून आई-वडिलांच्या डोळ्यात कौतुक दिसले आणि त्या दिवसापासून नाटकासाठी परवानगी मिळाली पण काही बंधन कायम होते. या वर्षी नाटक करू द्या, पुन्हा नाही करणार अशी परवानगी दर वर्षी काढून त्यांनी आजपर्यंत वाटचाल केली. रंगभूमीबरोबर वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. कुटुंबाच्या काही जबाबदाºया त्यांनी हसत हसत स्वीकारल्या. अहोरात्र कष्ट केले. त्यांच्या या समर्पित भावनेला नगरच्या नाट्य क्षेत्रात सन्मान दिला जातो. नजान सरांनी दाखविलेल्या मार्गावरुन जाताना पुढे सतीश लोटके, संजय लोळगे, गणेश लिमकर यांसारखे गुरू नाटकात मिळाले. सुनील राऊत हे लिखाणातील गुरू या सर्वांनी माझे कलाविश्व समृद्ध केले, असे विद्या सांगतात. लायकी नाही, आडात नाही तर पोहºयात कुठून येणार, नाटकात काम करणे एड्यागबाळयाचे काम नाही, असे टोमणे खात अपमान सहन करीत आज आपले हक्काचे स्थान निर्माण करणाºया विद्या जोशी नवीन पिढीला आदर्श ठराव्यात.आज वडील कै. विश्वंभर जोशी आज हयात नाहीत त्यांनी माझी सुरवात पाहिली, पण यश पाहू शकले नाहीत, याची खंत वाटते. भाऊ सुरेश याचा विरोध हा बहिणीवरील प्रेम आणि काळजी याच पोटी होता. त्याचा हात डोक्यावर आहे. त्यामुळे आज सुरक्षित वाटते. आई सुशीला हिने मात्र मला प्रोत्साहन दिले. तीच माझी प्रेरणा आहे, असे विद्या जोशी सांगतात. भविष्यात बालरंगभूमी अधिक सशक्त व्हावी म्हणून धडपड कारणाºया आणि रंगभूमीशी प्रामाणिक असणाºया या अष्टपैलू अभिनेत्रीस उज्ज्वल भविष्य आहे, असे मनस्वी वाटते.शशिकांत नजान, (लेखक नाट्य दिग्दर्शक व अभिनेते आहेत़)
नट-बोलट : रंगभूमिशी एकनिष्ठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 4:58 PM