श्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 05:46 PM2018-12-13T17:46:10+5:302018-12-13T17:52:33+5:30
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमने अहमदनगर महापालिकेची निवडणूक लढवली होती.
अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादग्रस्त ठरलेल्या श्रीपाद छिंदमच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला आहे. श्रीपाद छिंदमच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या निलेश म्हसे यांनी याबाबत जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच, छिंदमच्या विजयाला आव्हान देत ही निवड रद्दबातल ठरविण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमने अहमदनगर महापालिकेची निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे अपक्ष निवडणूक लढवूनही छिंदम या निवडणुकीत विजयी झाला आहे. मात्र, छिंदमच्या या विजयाला आक्षेप घेण्यात आला आहे. यापूर्वी जिल्ह्यातून तडीपार केल्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी छिंदम छत्रपतींसमोर नतमस्तक झाला. महापलिका निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर छिंदम मंगळवारी नगरमध्ये दाखल झाला. त्याने आपल्या कार्यालयात शिवाजी महाराजांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महापालिका निवडणुकीत छिंदमने प्रभाग क्रमांक 9 मधून अपक्ष उमेदवारी करीत विजय मिळविला. या प्रभागात छिंदमविरोधात अनिता राजेंद्र राठोड (राष्ट्रवादी), सुरेश रतनप्रसाद तिवारी (सेना), प्रदीप परदेशी (भाजप), पोपट भानुदास पाथरे (मनसे), प्रवीण शाहूराज जोशी (अपक्ष), निलेश सत्यवान म्हसे (अपक्ष), अजयकुमार अरुण लयचेट्टी (अपक्ष) हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी अपक्ष उमेदवार निलेश म्हसे यांनी छिंदमविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. या निवडणूक काळात प्रशासनाने छिंदमला शहरातून हद्दपार केले होते. सोमवारी निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी छिंदमने त्यांच्या दिल्लीगेट येथील कार्यालयात येऊन प्रथम महापुरूषांना अभिवादन केले.
यावेळी बोलताना छिंदम म्हणाला, निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होता आले नाही. मात्र, जनतेने मला निवडून दिले. हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. जिल्हा बंदीची मुदत संपल्यानंतर नगर शहरात आलो. या ठिकाणी मात्र कुणाचाही सत्कार न घेता प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरूषांना अभिवादन करून नतमतस्क झालो. या महापुरुषांच्या आशीर्वादानेच मला हा विजय मिळाला, असे छिंदमने म्हटले होते.