मिरी : दिवाळीच्या दिवशी भरदुपारी प्रसूतिसाठी आलेल्या महिलेला तीन तास ताटकळत ठेऊन अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात पाठवून हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ‘लोकमत’च्या वृत्तानंतर मिरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिभाऊ गाढे यांचा पदभार तातडीने काढून घेण्यात आला आहे. तर आरोग्यसेविकेची बदली करण्यात आली आहे.बुधवारच्या अंकात ‘लोकमत’ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची गंभीर दखल घेत पाथर्डीचे तालुका आरोग्याधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी वृत्त प्रसिद्ध होताच मिरी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.मिरी(ता.पाथर्डी) येथील राजेंद्र सादरे यांची मुलगी पल्लवी शेलार हिला दिवाळीच्या दिवशीच प्रसूतिकळा सुरू झाल्याने तिला प्रसूतिसाठी मिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. परंतु तीन तास उलटून देखील आरोग्य केंद्राचे कर्मचारी रूग्णाकडे फिरकलेच नाहीत. शेवटी सादरे यांनी आपल्या मुलीला १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेतून अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात हलविले.या सर्व प्रकारासंदर्भात मिरी ग्रामपंचायतीच्या सरपंच नीता मिरपगार, माजी सरपंच शशीकला सोलाट यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थांनी तालुका आरोग्याधिकारी डॉ. भगवान दराडे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची गंभीर दखल घेत डॉ. दराडे यांनी तत्काळ मिरी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन ग्रामस्थांसमोरच आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच कानउघडणी केली. कामात हलगर्जीपणा करणाºया आरोग्यसेविका ढाकणे यांची तडकाफडकी बदली करून कडगाव येथील आरोग्यसेविका कोरडे यांची नेमणूक केली. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिभाऊ गाढे यांचा पदभार काढून तो त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या डॉ. सचिन पिसे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.या बैठकीस डॉ. गाढे यांच्यासह काळू मिरपगार, जगदीश सोलाट, माजी सरपंच साहेबराव गवळी, ग्रामपंचायत सदस्य अशोक झाडे, संभाजी सोलाट, बापू कोरडे, राजेंद्र तागड, बापू मिरपगार, मुलीचे वडील राजेंद्र सादरे व ग्रामसेवक डी. जी. सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यासंदर्भात वरिष्ठांना अहवाल पाठवून पाठपुरावा करणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र २४ तास उघडे ठेऊन रात्रपाळीसाठी कर्मचा-यांच्या नेमणुका करण्याच्या सक्त सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. -डॉ. भगवान दराडे, तालुका आरोग्याधिकारी, पाथर्डी.