लोणी : खरीप हंगामातील शेती मशागतींच्या कामांना राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात सुरुवात झाली असून गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट मोठ्या प्रमाणात गडद आहे.
शेतमालाला कवडीमोल दर मिळत असताना डिझेलच्या दरात देखील दिवसेंदिवस भरमसाट वाढ होत आहे. त्यामुळे यंदा ट्रॅक्टरद्वारे केल्या जाणाऱ्या शेती मशागतींच्या दरातदेखील मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मशागतींच्या कामांना भांडवल उपलब्ध करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
दरवर्षी शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात खरीप हंगामातील पेरणीपूर्व म्हणजे बियाणे, खते, शेती मशागतींचे साहित्य गोळा करण्याच्या कामात व्यस्त असतात. त्यात गत दोन ते तीन वर्षांपासून शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटातून जात असताना कोरोनाने सलग दुसऱ्या वर्षीही डोके वर काढल्याने मोठा आर्थिक संकटाचा सामना करण्याची परिस्थिती शेतकरीवर्गावर ओढवली आहे.
गतवर्षाप्रमाणेच यावर्षीदेखील वेळेवर पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. उशिरा उन्हाळी कांदा लागवडीमुळे शेतातून कांदा काढण्यास उशीर झाला. त्यामुळे मशागतीच्या कामांना उशीर झाला. त्यातच मागील आठवड्यात राहाता तालुक्यात तौक्ते वादळामुळे सोसाट्याचा वारा व रिमझिम पाऊस झाला.
..............
मागील दोन वर्षांपासून शेतकरी अनेक प्रकारच्या नैसर्गिक संकटात सापडला आहे. यंदा खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना भांडवलाची आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. खतांच्या वाढलेल्या किमतीबाबत अद्यापही शेतकऱ्यांना संभ्रम असून खते कोणत्या दराने मिळणार, याची अद्यापही माहिती नाही.
- विठ्ठलराव शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
...............
डिझेल दरवाढीमुळे यंदा ट्रॅक्टरद्वारे करण्यात येणाऱ्या मशागतींत वाढ, प्रतिएकर येणारा खर्च वर्षनिहाय
वर्षे २०२० २०२१
नांगरणी १८०० २४००
लोडणे ७०० १००
वावर फनने ९०० ११००
सरी पाडणे ९०० १२००
यंत्राद्वारे पेरणी १२०० १५००
...........
यंदा अवकाळी पावसामुळे रोपांचे आणि कांद्याचे अतोनात नुकसान झाल्यानंतर शेतकरीवर्गाने मोठ्या शिताफीने मिळेल तेथून महागड्या दराने का होईना रोपे, कांद्याचे बी घेऊन उन्हाळ कांद्याची लागवड शेतकरीवर्गाला करावी लागली होती. त्यात अनेक ठिकाणी बियाणांमध्ये फसगत झाली आहे. याप्रमाणे सन २०२० मध्ये प्रतिएकरसाठी ५५०० रुपये एवढा खर्च आलेला असून यंदा डिझेल दरवाढीमुळे सन २०२१ मध्ये ७३०० रुपयांपर्यंत खर्च येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
300521\img20210518103115-01.jpeg
राहाता तालुक्यात खरीप पूर्व मशागतीची कामे वेगाने सुरु आहे.