अहमदनगर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना समोर आली असून या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि.५) रात्री ताब्यात घेतले. अरमान नईम शेख (रा.मुकुंदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला ९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आरोपीने आक्षेपार्ह भाषेत बोलून ते रेकॉर्ड करून ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली. ही क्लिप व्हायरल होताच आरोपीला एका व्यक्तीने फोन करून याबाबत विचारणा केली असता त्याने पुन्हा हिंदू भाषेतून आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. दरम्यान सदरची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला तपास करण्याच्या सूचना दिल्या.
निरिक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण करत सदरची ऑडिओ क्लिप करणाऱ्या अरमान शेख याला अर्धा तासात नगर शहरातून ताब्यात घेतले. त्याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्या विरोधात कलम २९५ अ, १५२ व ५०५ कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. सदर आरोपीवर कठोर कारवाईची त्यांनी मागणी केली.