श्रीरामपूर : कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना अधिकाऱ्यांनी चकवा दिला. त्यांच्याच विभागाने आकडेवारी लपवली. हा प्रकार थोरात यांच्या लक्षात आल्यानंतर महसूलमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली.
थोरात यांनी रविवारी येथील प्रशासकीय कार्यालयात बैठक आयोजित केली होती. त्यात अद्यापही प्रशासकीय यंत्रणा कोरोनाविरुद्धच्या लढाईत गंभीर नसल्याचे समोर आले. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, सचिन गुजर, अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे उपस्थित होते.
थोरात यांनी श्रीरामपुरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी सोबत आणली होती. त्यांनी स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला रुग्ण संख्या विचारली असता २५० रुग्ण कमी सांगण्यात आली. त्यामुळे थोरात अचंबित झाले. आरोग्य विभाग व महसूल प्रशासन यांच्यात कोणताही समन्वय नसल्याचे यानिमित्ताने दिसले. त्यावर थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी एकत्रित येत मनापासून काम करावे लागेल, अशी तंबी त्यांनी दिली.
शहरांमध्ये प्रामुख्याने रुग्णांची संख्या अधिक असली तरी आसपासच्या खेडे गावांकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. शहरातून गावाकडे कोरोना पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. घरी उपचार घेणाऱ्या सौम्य लक्षणाच्या रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण करावे, असे आदेश थोरात यांनी दिले.
आमदार लहू कानडे म्हणाले, श्रीरामपूर तालुक्यासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये यापूर्वीच ५० खाटांची कोरोना रुग्णांची उपचार व्यवस्था निर्माण केलेली आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता राज्य आपत्ती व्यवस्थापन अथवा इतर यंत्रणेकडून आणखी निधी उपलब्ध करून द्यावा. तसे झाल्यास गरिबांकरिता ४० ते ५० खाटांची मोफत उपचार व्यवस्था करता येईल.
--------
टी शर्टवर आलेल्या डॉक्टरला हाकलले
बैठकीमध्ये माहिती देण्याऱ्या एका डॉक्टरने टी शर्ट परिधान केलेला होता. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांना बैठकीतून बाहेर जाण्याचे आदेश दिले.
-----------