शिर्डी : उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा ९२ टक्के अधिक संपत्ती संपादीत केल्याचे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाल्याने शिर्डी नगरपंचायतीचे मुख्य लिपीक मुरलीधर बाजीराव देसले व पत्नी रेखा देसले दाम्पत्याविरूध्द बुधवारी शिर्डी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, देसले यांनी १९९४ ते २०१० या काळात शासकीय सेवेत असताना त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा गैरमार्गाने एकूण १७ लाख ३० हजार ६१८ रूपयांची अपसंपदा जमा केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. सदर अपसंपदा संपादीत करण्यासाठी त्यांच्या पत्नी रेखा देसले यांनी सहाय्य केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आज देसले दाम्पत्याविरूध्द शिर्डी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर विभागाचे पोलीस उपअधीक्षक किशोर चौधरी, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, दीपक करांडे, हेड कॉन्स्टेबल तन्वीर शेख, पोलीस नाईक प्रशांत जाधव, विजय गंगुल, अशोक रक्ताटे, महिला पोलीस राधा खेमनर यांचा सहभाग होता.