शिर्डी : साई संस्थान रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या मुद्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी दोन्ही रुग्णालयात तातडीच्या सेवा वगळता बंद ठेवून आंदोलन केले़ दरम्यान डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या तरुणाला गुरुवारी सायंकाळी शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने या तरुणाची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़आठ दिवसांपूर्वी नातेवाईकाच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार धरत राजेंद्र घाडगे या राहुरीच्या तरुणाने गुरुवारी साईबाबा रुग्णालयातील हृदय शल्यविशारद डॉ़ विद्युतकुमार सिन्हा यांना मारहाण केली होती़ यानंतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले होते़ पोलिसांनी तातडीने कारवाई करीत घाडगे याला गुरुवारी सायंकाळीच शिर्डीत आणले़ मात्र, अशा घटना वारंवार घडत असल्याने व भितीच्या सावटाखाली चांगली सेवा देणे अवघड असल्याने रुग्णालयातील त्रुटींकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी दोन्ही रुग्णालये बंद ठेवण्यात आली़उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे, वैद्यकीय संचालक डॉ़ राव, वैद्यकीय अधिक्षक डॉ़ संजय पठारे, प्रशासकीय अधिकारी गर्कल, डॉ़ मखवाना यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली़ यावेळी सर्वांनीच मारहाणीचा निषेध करीत अशा घटना टाळण्यासाठी बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरु करावेत, रुग्णालय प्रवेशद्वारांची संख्या मर्यादीत करावी, प्रत्येक द्वारावर कंत्राटी बरोबरच संस्थानचा सुरक्षा रक्षक तैनात करावा, सुरक्षा विभागाने स्वतंत्र शिफ्ट इंचार्जची नियुक्ती करावी, रुग्णांची भेटीची वेळ व नियमावली निश्चित करावी, धर्मशाळेप्रमाणे थेट आॅपरेशन थिएटरपर्यंत प्रवेश प्रतिबंध करावा, रिक्त जागा तातडीने भराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या़ यावेळी डॉ़ राव, डॉ़ संजय पठारे, डॉ़ विद्युतकुमार सिन्हा, डॉ़ हरीष बजाज, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ़ शुभा मेहरोत्रा, डॉ़ रचना साबळे, अधिसेविका मंदा थोरात, थॉमस गायकवाड आदींची भाषणे झाली़ तर नागरिकांच्या वतीनेही दिलीप संकलेचा, डॉ़ राजेंद्र पिपाडा, राजेंद्र भुजबळ यांनी या घटनेचा निषेध केला़ प्रशासनाच्या वतीने उपकार्यकारी अधिकारी शिंदे यांनी सीसीटीव्ही लावणे व सुरक्षा विषयक त्रुटी दूर करण्याचे आश्वासन दिले़यावेळी कमलाकर कोते, शिवाजी गोंदकर, विजय जगताप यांच्यासह डॉक्टर्स व नर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते़ तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने डॉ़ नचिकेत वर्पे यांनी घटनेचा निषेध केला़ (तालुका प्रतिनिधी)
साईसंस्थानची रुग्णालये बंद
By admin | Published: August 29, 2014 11:25 PM