शेवगाव : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी बुधवारी शेवगाव तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.पक्षाचे जिल्हा सचिव अॅड. सुभाष लांडे, ज्येष्ठ नेते कृष्णनाथ पवार, शशीकांत कुलकर्णी, संजय नांगरे, राम पोटफोडे, बापूराव राशीनकर, अशोक नजन, कारभारी वीर, आत्माराम देवढे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. निवासी नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ यांनी निवेदन स्वीकारले. संजय गांधी योजना विभागाचे संबंधित मात्र मोर्चाला सामोरे आले नाहीत.या आंदोलनात योजनेच्या लाभापासून वंचित असलेले वृद्ध निराधार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तालुक्यात गेल्यावर्षी संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजनेचे १५ हजारांपर्यंत लाभधारक होते. सध्या योजनेची तालुका समिती अस्तित्वात नसल्याने तहसील कार्यालयातील अधिकारी योजनेचे काम पाहत आहेत. तालुक्यातील अनेक लाभधारकांना योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. नवीन प्रस्ताव दाखल केल्यास अनेक चकरा माराव्या लागतात.प्रस्ताव मंजुरीच्या चौकशीसाठी गेल्यास कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या बैठकीत २ हजारपैकी २०० ते २५० प्रस्ताव मंजूर झाले. इतर प्रस्ताव अपुऱ्या कागदपत्रांमुळे पेंडिंग ठेवण्यात आले. संबंधितांना पत्राद्वारे अपुऱ्या कागदपत्रांची पूर्तता कळविण्याचे सौजन्य संबंधितांनी दाखविले नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजनेचा गरजूंना लाभ मिळावा, पेन्शन योजनेचा कायदा करावा, बंद प्रकरणे पुन्हा सुरु करावीत, नवीन प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत, सर्व वृद्ध, विकलांग व परित्यक्त्यांना दरमहा किमान १ हजार रुपये पेन्शन मिळावी, नवीन प्रस्ताव दाखल करणाऱ्यांना तलाठ्याकडून २१ हजार रुपये उत्पन्नाचा दाखला मिळावा.
रणरणत्या उन्हात वृध्द, निराधार रस्त्यावर
By admin | Published: October 20, 2016 1:04 AM