जामखेड : बारामतीहुन भूमकडे जाणारी बसमध्ये एका वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
बारामतीहुन भूमकडे जाणारी बस (एम.एच.-१४, बी.टी. १५७७) जामखेड मार्गे येत असताना शनिवार सकाळी सहाच्या सुमारास (खडकत, ता. आष्टी) येथे आली असता तेथून एक वृध्द व्यक्ती बसमध्ये चढला. तो जामखेड तालुक्यातील पाटोदा(गरड) येथे उतरणार असल्याने गाडी थांबल्यानंतर वाहकाने आवाज दिला. प्रतिसाद न मिळाल्याने वाहक तो वृध्द बसला होता त्या सिटजवळ गेले. तेंव्हा त्याच्या तोंडाला फेस आला होता असे दिसून आले.
सदर बस चालक राजाराम नागरगोजे आणि वाहक चैतन्य फटाले यांनी पाटोदा येथील सरपंचांना बोलवून घेतले.सदर व्यक्तीस ओळखता का? विचारलं तर त्याने हा आमच्या गावचा माणूस नाही, असे सांगितले. यामुळे त्यांनी सरळ जामखेड पोलीस स्टेशन गाठले असता पोलिसांनी सदर व्यक्तीला जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी त्यास मृत घोषित केले आहे.
सदर घटनेचा तपास जामखेड पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल शशांक म्हस्के करत आहेत. वृध्दाची अद्याप ओळख पटलेली नसून जर या व्यक्तीस कोणी ओळखत असेल तर. त्यांनी ताबडतोब जामखेड पोलीस स्टेशनला संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.