आॅनलाइन लोकमत श्रीगोंदा (अहमदनगर), दि़ १९- सोसाट्याचा वारा द्राक्ष बागेत घुसून एक एकर द्राक्ष बाग जमीनदोस्त झाली. सोमवारी मध्यरात्री पारगाव सुद्रिक (ता.श्रीगोंदा) येथे सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.शेतकरी आबासाहेब रेपाळे यांची वडाळी शिवारात ९ एकर द्राक्ष बाग आहे. पैकी एक एकरमधील द्राक्ष बाग पंधरा दिवसांवर तोडणीसाठी आली होती. सोमवारी मध्यरात्री आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बागेच्या मंडपाचे लोखंडी पोल वाकून संपूर्ण द्राक्ष बागच जमीनदोस्त झाली. रेपाळे यांचे पारगाव व वडाळी गावच्या हद्दीत २५ एकर शेत आहे. बँक व सोसायटीचे अठरा लाखांचे कर्ज घेऊन त्यांनी द्राक्ष व डाळिंब बाग उभारली होती. एक एकर द्राक्ष बागेतील द्राक्ष काढणी अवघ्या पंधरा दिवसावर आली असताना द्राक्ष बागेच्या उभारणीसाठी केलेला मंडप वाऱ्यामुळे पडला. चालू हंगामात द्राक्ष उत्पादन सरासरी वाढल्याने बागेतून साधारण २५ टनापर्यंत माल अपेक्षित होता. सध्या ३५ ते ४० रुपयांचा बाजार गृहीत धरल्यास किमान वीस लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित होते. मात्र बाग पडल्याने द्राक्ष खराब झाली तसेच बागेचे कायमचे नुकसान झाले आहे. वाढता उत्पादन खर्च पहाता हे नुकसान अधिक आहे . यंदा सरासरीच्या तुलनेत एकरी आठ ते पंधरा टनापर्यंत उत्पन्न वाढल्याने बागेत मंडपावर ताण वाढला आहे. हा ताण सहन न झाल्याने बाग कोसळून नुकसान झाले. राज्य सरकारची फळबाग पीक विमा योजना असली तरी योजनेचा शेतकऱ्यांना फारसा लाभ होत नाही. उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारी विमा रक्कम तोकडी आहे. यातून शेतकऱ्याला खर्चाचा मेळ घालताना नाकीनऊ येते. त्यामुळे शेतकरी फळबाग विमा उतरवत नाहीत. शासनाची द्राक्ष बागांची विमा योजना कुचकामी आहे, असे फळबाग अभ्यासक माऊली हिरवे यांनी सांगितले़
एक एकर द्राक्ष बाग वादळी वाऱ्यामुळे उद्ध्वस्त
By admin | Published: April 19, 2017 12:50 PM