शेवगाव : नागपूर येथील राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था व अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवात शेवगावच्या बाळासाहेब भारदे विद्यालयाच्या ‘सूर्याची मुलगी’ या एकांकिकेची द्वितीय क्रमांकाने विभागीय स्तरावर निवड झाली. हा संघ अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.ऊर्जा समस्येवर मात करण्यासाठी सौर उर्जेच्या वापराचा संदेश या एकांकिकेतून प्रभावीपणे दिला गेला आहे. या एकांकिकेचे दिग्दर्शन निलेश मोरे व उमेश घेवरीकर यांनी केले. यात शाळेच्या मुग्धा घेवरीकर, प्रेरणा बैरागी, दिव्या काळे ,ऐश्वर्या नाईकवाडी, गोपिका नरवडे, तेजश्री भोसले, पराश नाईक व ऋषिकेश मोडे या विद्यार्थी कलावंतानी उत्कृष्ट भूमिका केल्या.नगर येथील कलाकार मृणाल कुलकर्णी, मंदार देव यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. जिल्हा परिषदचे उपशिक्षणाधिकारी एस. एस. सोनावणे, जिल्हा विज्ञान संघटनेचे अध्यक्ष बद्रिनाथ शिंदे, बळीराम गरड यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. रमेश भारदे, विश्वस्त हरिश भारदे, मुख्याध्यापक मदन मुळे, उपमुख्याध्यापक सुधीर आपटे, पर्यवेक्षक संजय कुलकर्णी व शिवदास सरोदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.