नेवासा : नगर-औरंगाबाद महामार्गावर खडका शिवारात सोमवारी सकाळी भरदिवसा वाहन चालकास चाकूचा धाक दाखवून १ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम लांबविली. याप्रकरणी वाहन मालक राजकुमार दिलीप चव्हाण (रा.जिंतूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अहमदनगर येथे दोरीचा माल खाली करून राजकुमार चव्हाण व क्लिनर किशन सुरवशे हे दोघे गाडी क्रमांक (एम.एच.२१-बी एच.०९०६) घेऊन दि. ४ मे रोजी जिंतूरकडे निघाले दरम्यान सकाळी साडेनऊच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावरील खडका टोल नाक्याजवळ रस्त्याच्या कडेला झाडाखाली चव्हाण व सुरवशे जेवणासाठ थांबले. जेवण करून गाडीकडे जात असताना तेथे दुचाकीवर आलेल्या एकाने दोघांना शिव्या दिल्या. हातात दगड उचलून चाकूचा धाक दाखवून चव्हाण यांच्या हातातून गाडीची चावी घेतली. याननंतर चव्हाण यांच पॉकेट मोबाईल व पँटच्या खिशातील १६ हजार रुपये बळजबरीने घेतले. त्यानंतर गाडीची डिक्की खोलून त्यामधील १ लाख ३६ हजार ६०० रुपये काढले. टेम्पो लॉक करून घेतला. घेतलेला मोबाइल फोन व पाकीट तिथे टाकून तो मोटारसायकल वरून अहमदनगरच्या दिशेने निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान तपासासाठी नेवासा पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे.
नगर-औरंगाबाद महामार्गावर वाहन चालकास भरदिवसा दीड लाखाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 3:45 PM