नेवासा : तालुक्यातील कुकाणा येथे कृषी उत्पन्न उपबाजार समितीजवळ विक्रीसाठी गावठी कट्टा घेऊन आलेल्या ओरापीला पोलिसांनी शिताफीने अटक करण्यात केली. आरोपीकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.कुकाणा येथे अवैध धंद्याची माहिती घेण्यासाठी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास शाखेचे प्रमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड, गणेश मैड, जयवंत तोडमल, महेश कचे, भीमराव पवार हे आले होते. त्यांना बाजार समितीजवळ कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती आल्याची माहिती मिळाली. पोलीस तेथे गेले असता बाजार समितीच्या भिंती नजीक एक इसम संशयितरित्या फिरताना आढळला. त्यास हटकले असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. तसेच त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आढळून आला. त्याने आपले नाव राजू ज्ञानेश्वर साळुंके (वय २१, रा. कुकाणा) असल्याचे सांगितले. पोलीस कॉन्स्टेबल गणेश सुरेश मैड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड हे करीत आहेत.
गावठी कट्ट्यासह एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 2:47 PM