आॅनलाईन लोकमतटाकळी ढोकेश्वर / अहमदनगर, दि़ २५ - नगर जिल्ह्यात गुरुवारी दुपारी जोरदार वादळ झाले़ या वादळामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली़ पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे चार वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह पाऊस झाला़ याचवेळी वीज कोसळल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दोघेजण जखमी झाले़टाकळी ढोकेश्वर (पारनेर) येथे चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाट पावसाला सुरुवात झाली़ यावेळी नवोदय विद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट स्पर्धा सुरु होती़ नेमकी याच मैदानात वीज कोसळल्यामुळे गोकुळ सुरेश वाघ (वय २३) हा तरुण जागीच ठार झाला तर अन्सार यासीन पटेल (वय २७, रा. ढवळपुरी) व राजाराम जानकू डावखर (वय ४५, रा.बेल्हे ता.जुन्नर) हे दोघे जखमी झाले आहेत़ टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत़ ढोकी तलावाजवळ चरत असलेल्या पाच मेंढ्या या वादळी पावसामुळे मृत्यूमुखी पडल्या़ अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली़ शेतकऱ्यांच्या कांद्यासह आंब्याचे मोठे नुकसान झाले़ दरम्यान दुपारी तीन वाजल्यापासून नगर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार वादळ सुरु झाले़ या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली़ तर काही ठिकाणी घरांवरील पत्रेही उडाली़ या वादळातच काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला़ मात्र, हा पाऊस अत्यंत थोडा वेळ झाला़ नगर तालुक्यातील अरणगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या इमारतीचे पत्रे वादळामुळे उडाले़ बाबुर्डी बेंद परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला़ कोल्हार येथे साडेचार वाजता सोसाट्याचा वारा, विजांचा गडगडाट सुरु झाला़ मात्र, पाऊस झाला नाही़ यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली़ राहाता परिसरातही जोरदार वादळ होते़ त्यामुळे बाजारकरुंचे मोठे हाल झाले़ लोणी परिसरात गारपीट झाली़ त्यामुळे आंबा, डाळिंब पिकाचे नुकसान झाले़
टाकळी ढोकेश्वरमध्ये विज पडून एकचा मृत्यू; दोन जखमी
By admin | Published: May 25, 2017 5:37 PM