पारनेर : कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असून, पारनेर तालुक्यातील नागरिकांना तत्काळ लसीकरणाची सोय व्हावी यासाठी पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शासनास एक लाख रुपयांची मदत देणार असल्याचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.
बाजार समितीमार्फत सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच मदतीचा हात देण्यात येतो. कोरोना संकट काळातही प्रशासनास मदत व्हावी यासाठी नफ्यातून दोन लाख रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. विशेषत: कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी तालुक्यातील नागरिकांसाठी ही मदत वापरण्यात यावी, अशी अपेक्षा संचालक मंडळाने व्यक्त केलेली आहे. दरम्यान लसीकरणासाठी आवश्यक लसी उपलब्ध होणार असतील तर एखाद्या कोविड सेंटरला ही मदत देण्यात यावी, अशी सूचनाही जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्यामार्फत शासनास पाठविण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.