भेंडा : लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना सांस्कृतिक मंडळाने मयत सदस्याच्या वारसाला एक लाख रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश मंडळाचे अध्यक्ष अनिल शेवाळे यांच्या हस्ते दिला.
कारखाना अभियांत्रिकी विभागातील कामगार सोमनाथ शेषराव तांबे (वय ३६) यांचे ऑक्टोबर २०१९ मध्ये आजारपणात निधन झाले. कारखाना व्यवस्थापन व सांस्कृतिक मंडळ यांच्या निर्णयानुसार मयत कामगार सदस्याच्या वारसाला एक लाख रुपये देण्याचा धोरणात्मक निर्णय अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यानुसार तांबे यांच्या पत्नी वर्षा , मुलगी संस्कृती व भाऊ भाऊसाहेब तांबे यांच्याकडे १ लाखांचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष सीताराम चौधरी, सचिव कृष्णा उगले, खजिनदार कारभारी गरड, मानद सचिव तुकाराम बोडखे, सदस्य राजेंद्र शिंदे, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, विलास लोखंडे, सचिन मरकड आदींच्या उपस्थितीत देण्यात आला.