कोपरगाव (जि. अहमदनगर) : “आपण आरक्षणाशिवाय उभं राहायला शिकले पाहिजे. हे वाचनातूनच घडते. कारण वाचनामुळे दोन कानांमधील प्रदेश सुपीक होतो. निर्णय घेण्याची क्षमता वाढते. संस्कृती घडते व संवाद वाढतो. स्व-जाणीव जागृत होते. निर्णय घेण्याची क्षमता तयार होते. म्हणूनच आपल्या मातृभाषेतील अनेक पुस्तके आणि कर्मवीर अण्णांचे जीवन चरित्र वाचले पाहिजेत. यासाठी नव तंत्रज्ञानाचा सदुपयोग करून घेतला पाहिजे, असे मत प्रख्यात वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.
येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय कोपरगाव, डॉ. सी.एम. मेहता कन्या विद्यामंदिर, कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय या शाखांच्या वतीने कर्मवीर जयंती सोहळा संपन्न झाला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रामदास फुटाणे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे हे होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोकराव काळे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बिपिन कोल्हे तसेच महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य चैताली काळे व विवेक कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या. पद्माकांत कुदळे, कारभारी आगवन, मच्छिंद्र रोहमारे, बाळासाहेब कदम, ॲड. संदीप वर्पे, अरुणचंद्रे, सुनील गंगुले, यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. रमेश सानप, मन्सुरी सिराज शेखलाल, प्रमोदिनी शेलार, . सुभाष दरेकर, नंदकुमार खाडे महाविद्यालयातील तिन्ही शाखांचे उपप्राचार्य डॉ. सुभाष रणधीर, प्रा. अरुण देशमुख, डॉ. अर्जुन भागवत तसेच प्रा. संजय शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
पुढे बोलताना फुटाणे म्हणाले, झपाट्याने बदलणाऱ्या जगात आपले अस्तित्व क्षणभंगुर आहे. कदाचित पुढील काळात मानवाच्या स्री व पुरुष या दोनच जाती असतील. त्यामुळे जातीपातीत अडकू नये. शाळेच्या दाखल्यावरून जोपर्यंत जात हा शब्द जात नाही, तोपर्यंत एकात्म व एकसंध भारताचे सुंदर दर्शन घडणार नाही. राजकारणी स्वार्थासाठी जातीचा उपयोग करून घेत आहेत. आपण मात्र या जातीभेदाच्या खडकावर एकात्मतेचे वृक्षारोपण करायला हवे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सीमा चव्हाण, डॉ. वैशाली सुपेकर, प्रा,डॉ.सुनिता अत्रे व प्रा. रवींद्र हिंगे यांनी केले.