अरूण वाघमोडेअहमदनगर : क्षेत्रफळाने राज्यात सर्वाधिक मोठा आणि गुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात सध्या ३ हजार २७७ पोलीस कर्मचारी आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत १५२५ लोकांमागे अवघा एक पोलीस कर्मचारी कार्यरत आहे.जागतिक स्तरावर साधारणत: २०० लोकांमागे एक पोलीस असावा असे प्रमाण आहे. महाराष्ट्रात ३०० ते ३५० लोकांमागे एक पोलीस कार्यरत असणे असे प्रमाण आहे. नगर जिल्ह्यात मात्र हे प्रमाण खूपच कमी आहे. परिक्षेत्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार या जिल्ह्याच्या तुलनेत नगरमध्ये गुन्हेगारी घटनांचे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. नगरच्या तुलनेत नाशिक ग्रामीण आणि जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, गुन्ह्यांचे प्रमाणही कमी आहे. या दोन जिल्ह्यात मात्र नगरच्या तुलनेत पोलीस कर्मचारी आणि पोलीस ठाण्यांची संख्याही अधिक आहे.अपुऱ्या पोलीस बळात व्हीआयपी बंदोबस्त, सण, मिरवणुका, मोर्चे, आंदोलने हे सर्व सांभाळून जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी निभावतांना पोलिसांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची ४५ लाख ४३ हजार १५९ इतकी लोकसंख्या आहे. गेल्या सात ते आठ वर्षांत साडेचार ते पाच लाखांनी ही लोकसंख्या वाढली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या मात्र वाढविण्यात आलेली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जिल्ह्याचे क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि गुन्ह्याचे प्रमाण याचा तुलनात्मक अभ्यास करून शासनाला अहवाल पाठविलेला आहे. नगरचे पोलीस बळ वाढविण्याची मानसिकता मात्र शासनाची दिसत नाही. सध्या मोहरम आणि गणेशोत्सवमुळे जिल्ह्याबाहेरून पोलिसांची मागणी केली आहे.नगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी आहे. नाशिक परीक्षेत्रातील जिल्ह्यांच्या तुलनेत नगरमध्ये गुन्ह्याचे प्रमाण जास्त आहे. या संदर्भात गृह विभागाला तुलनात्मक माहिती देण्यात आलेली आहे. येणा-या काळात नगरमध्ये पोलिसांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे. सध्या आहे त्या पोलीस बळात नियोजन करून कायदा आणि सुव्यवस्था राखली जात आहे. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणा-या प्रत्येकाची फिर्याद दाखल करून घेतली जाते. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.जिल्ह्यात पोलिसबळ कमी असल्याने गणेशोत्सव आणि मोहरमच्या बंदोबस्तासाठी बाहेरील जिल्ह्यातून १००० पोलिसांची मागणी करण्यात आलेली आहे.
सहा ठाण्यांची मंजुरी प्रलंबितजिल्हा पोलीस प्रशासनाने गृह विभागाकडे केडगाव, सावेडी (नगर), बोधेगाव (शेवगाव), देवळालीप्रवरा (राहुरी), मिरजगाव (कर्जत) तिसगाव (पाथर्डी) या पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव पाठविलेला आहे. शासनाकडून मात्र या ठाण्यांना अद्यापपर्यंत मंजुरी मिळालेली नाही.