कर्जत (जि. अहमदनगर) : मिरजगाव (ता. कर्जत) येथील शासकीय हमीभाव मका खरेदी केंद्रावर प्रत्येक शेतकºयांकडून किलोमागे एक रूपया अधिक घेतला जात आहे. त्याचे कारण विचारले असता आमदार रोहित पवार यांनीच एक रूपया अधिक घेण्यास सांगितले आहे, असे सांगण्यात आले, अशी तक्रार मार्केटिंग फेडरेशनकडे कर्जत तालुक्यातील शेतकरी महेंद्र धांडे यांनी केली आहे. या प्रकाराची चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय आधारभूत मका खरेदी केंद्र मिरजगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू आहे. हे केंद्र कर्जतकर फार्मर प्रोड्युसर कंपनी चालवत आहे. या केंद्रावर १ हजार ७६० रूपये या शासकीय हमीभावाने शेतकºयांकडील मकाची खरेदी केली जाते आहे. रविवारी (दि.२१) कर्जत तालुक्यातील धांडेवाडी येथील शेतकरी महेंद्र धांडे हे त्या केंद्रावर मका घेऊन गेले होते.
यावेळी येथील केंद्रचालक पप्पू नेटके हे मकाचे किलो मागे एक रूपयाप्रमाणे पैसे द्यावेत, तरच तुमचा माल घेईल, असे सांगितल्याचे धांडे यांचे म्हणणे आहे. पैसे कशासाठी घेता असे विचारताच त्याने आमदार रोहित पवार यांनीच एक रूपया किलोमागे घ्या असे सांगितल्याचे म्हटले. त्यामुळे ही बाब रोहित पवार यांच्या लक्षात आणून दिली, असे धांडे यांनी सांगितले. त्यांनी याबाबत मार्केटिंग फेडरेशनकडेही तक्रार केली आहे. येथे होणारी शेतकºयांची लूट थांबवावी, अन्यथा कर्जत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा धांडे यांनी दिला आहे. ---रोहित पवारांकडून प्रतिक्रिया नाही...याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्याशी संपर्क करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या कार्यालयाशीही संपर्क केला. कार्यालयातील कर्मचाºयांनी रोहित पवार व्यस्त असल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.---
मिरजगाव येथील कृषी बाजार समितीच्या आवारात शासकीय हमीभाव मका खरेदी केंद्र सुरू आहे. येथे शेतकºयांकडून कोणत्याही प्रकारे अधिकचे पैसे घेतले जात नाहीत. हमाली, वारई, टप करण्याचे पैसे घेत असतील, तर मलाही सांगता येत नाही.-पप्पू नेटके, चालक, मका हमीभाव खरेदी केंद्र, मिरजगाव