संगमनेर शहरात अनेक रुग्णालये आहेत. येथे संगमनेरबरोबरच अकोले, सिन्नर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता आदी तालुक्यांच्या ग्रामीण भागातील रुग्ण उपचारांसाठी नेहमीच येतात. घर लांब असते, नातेवाईकही जवळ नसतात. अशावेळी रुग्ण व त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तींच्या जेवणाची परवड होते. ही बाब संगमनेर नगर परिषदेचे माजी नगरसेवक, संगमनेर व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष शिरीष मुळे यांच्या लक्षात आली. याबाबत त्यांनी काही व्यापारी व डॉक्टर यांच्यांशी चर्चा करीत गरीब, गरजू रुग्णांना दररोज दोन वेळ जेवणाचे डबे मोफत पुरविण्याच्या उपक्रमाची संकल्पना मांडली. याला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमासाठी दर महिन्याला पाच हजार रुपये देण्याकरिता १२ जण पुढे आले. त्यातून रुग्णसेवा व्यापारी मित्रमंडळाची स्थापना झाली. पहिल्या दिवशी ७ डब्यांपासून सुरुवात झाली. डब्यांची मागणी वाढत होती.
कोरोनाच्या काळात ही मागणी अधिकच वाढली असून, सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे रुग्ण व त्यांच्यासोबत असलेल्या शंभरहून अधिक जणांना दरारोज दोन वेळ डबे मोफत पुरविण्यात येत आहेत. त्याकरिता पाच संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. त्यावर सकाळी ९.३० व संध्याकाळी ६.३० पर्यंत संपर्क केल्यास दुपारी साडेबारा व संध्याकाळी साडेआठच्या आत डबा पोहोच होतो. या उपक्रमात शिरीष मुळे, श्रीगोपाल पडतानी, संतोष करवा, रमेश दिवटे यांच्यासह डॉ. अमोल कासार, डॉ. नितीन जठार, सामाजिक कार्यकर्ते विनय गुणे आदींचा समावेश आहे. उपक्रमात पारदर्शकता असावी म्हणून रुग्णसेवा व्यापारी मित्रमंडळाच्या नावाने बँकेत खातेदेखील उघडण्यात आले आहे.
-----------
रुग्णसेवा व्यापारी मित्रमंडळाकडून आवाहन
रुग्णसेवा व्यापारी मित्रमंडळाने सुरू केलेला उपक्रम दिवसेंदिवस वाढत असून, यात दात्यांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा. जेणे करून गरीब, गरजू रुग्णांना त्याचा अधिक लाभ आपल्याला देता येईल, असे आवाहन
रुग्णसेवा व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
--------
ओझा परिवाराचा सेवाभाव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सुदाम ओझा व त्यांच्या पत्नी सारिका ओझा हे दाम्पत्य स्वत: दोन वेळचा स्वयंपाक बनवून प्रत्येक रुग्णालयात जाऊन डबे पोहोच करतात. चार पोळ्या, दोन भाज्या, दाळ-भात असे हे घरगुती रुचकर जेवण असते. सेवाभावीवृत्तीने ओझा परिवार हे कार्य करीत आहे. रुग्णसेवा व्यापारी मित्रमंडळ व ओझा परिवाराचे अनेकांकडून कौतुक होत आहे.