लोकमत न्यूज नेटवर्क, शिवाजी पवार, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : येथील बाजार समितीमध्ये बुधवारी झालेल्या कांदा लिलावात ५ हजार रुपये क्विंटल (५० रुपये किलो) प्रमाणे उच्चांकी दर मिळाले. त्यामुळे कांद्याची साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
बुधवारी बाजार समितीत ६ हजार ८२० कांदा गोण्यांची आवक झाली. यात चांगल्या प्रतीच्या मालाला ५ हजार रुपये क्विंटल दर मिळाला. दुय्यम प्रतीचा माल ३५०० रुपये तर हलक्या दर्जाचा माल २००० रुपये क्विंटल दराने विक्री झाला. गोल्टी कांद्याला ३६०० रुपये दर मिळाले. बाजार समितीत आता गोणीतील कांद्याची आवक कमी होत आहे. शेतकर्यांकडील साठवणूक केलेला माल आता कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळातही दर टिकून राहतील, अशी स्थिती आहे.
दुसरीकडे येथे होणाऱ्या मोकळ्या कांद्याच्या लिलावावेळी ११८ वाहने दाखल झाली. मोकळ्या कांद्यालादेखील ४००० रुपये क्विंटल दर मिळाला. दुय्यम प्रतीचा माल ३५०० रुपये क्विंटल दराने तर हलका प्रतवारीचा माल ३००० रुपये क्विंटलने विक्री झाला. गोणीतील कांद्याची आवक घटली असली तरी मोकळ्या कांद्याची आवक मात्र टिकून आहे. विशेषत: वैजापूर व गंगापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर वाहने बाजार समितीत येत आहेत.
नाफेडमार्फत शेतकऱ्यांकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली होती. तो माल पुन्हा बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणला जात होता. त्यामुळे कांद्याचे दर पाडण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. या संस्थांकडील कांदा आता संपल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मालाच्या मागणीत वाढ होऊन उच्चांकी दर मिळत आहेत. आगामी काळातील दिवाळी सणामुळे कांद्याला मागणी आहे. ते शेतकर्यांच्या पथ्यावर पडले आहे.