गोरख देवकरअहमदनगर : उसाचे आगार अशी ओळख असलेल्या जिल्ह्याच्या उत्तरेत गेल्या चार वर्षांपासून कांद्याने (गावरान) घुसखोरी केली आहे. संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवाशातील शेतकरीही ‘रब्बी’त कांद्यालाच पसंती देऊ लागले आहेत.गोदावरी, प्रवरा, मुळा नदीसह भंडारदरा, निळवंडे, मुळा धरणाचे पाणी उपलब्ध असलेल्या उत्तरेतील शेतकऱ्यांचे ऊस हेच लाडके पीक राहिले आहे. प्रामुख्याने साखर कारखानदारीही याच भागात फुललेली दिसते. काही भागात फळबागाही आहेत. मात्र गत पाच वर्षांपासून वातावरणातील बदल, उन्हाळ्यात पाण्याची कमतरता, ठराविक कालावधीनंतर मिळणारा भाव यामुळे या भागातील शेतकरी कांद्याकडे वळल्याचे दिसते. ‘समन्यायी’ पाणी वाटप कायद्यानंतर पुरेसा पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते. त्यामुळे ऊस जगविताना अडचणी येतात. त्याशिवाय तुलनेत कांदा साडेतीन चार महिन्यात निघणारे पीक आहे. त्यामुळे उसाबरोबरच शेतकरी कांद्यालाही पसंती देतात.विशेषत: कोपरगाव, राहाता, राहुरी, श्रीरामपूरला कांदा लागवड होते. संगमनेरच्या पठार भागात खरीप हंगामात लाल (नाशिक) कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होते. त्या कांद्याचे गणित पावसावर असते. इतर भागात मात्र रब्बी हंगामात कांदा (गावरान) लागवड होते. खरिपात कांदा लागवडीचे प्रमाण तसे नगण्य आहे. भाव नसल्यास कांदा चाळींमध्ये साठवणूकही केली जाते. भावातील चढउतारानुसार कांदा किती दिवस ठेवायचा हे शेतकरी ठरवितात.संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, राहुरी, वांबोरी, घोडेगाव (ता. नेवासा)आदी बाजार समित्यांमध्ये शेतकरी कांदा विक्रीस आणतात. कोपरगाव, संगमनेरचे शेतकरी येवला, लासलगावलाही कांदा विक्रीसाठी पाठवितात. गेल्या काही वर्षांपासून पूर्वेकडील पश्चिम बंगाल, ओरिसामध्येही कांदा पाठविला जात आहे.
‘उसाच्या आगारा’त कांद्याला पसंती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:49 PM