राशीन: करमनवाडी (ता.कर्जत) येथील विश्वनाथ रामचंद्र खराडे वृध्द कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कांद्याला मंगळवारी कर्जतच्या बाजार समितीत प्रति किलो एक ते दीड रूपया किलो असा मातीमोल भाव मिळाला. रिकाम्या गोण्यांचे व कांदा निवडीसाठीची मजुरी त्यांना पदरमोड करून भरावी लागली. कांद्याच्या पडलेल्या या भावाची कथा सांगताना या शेतकºयाच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते.दुष्काळावर मात करण्यासाठी साठवून ठेवलेला कांदा करमनवाडी येथील खराडे यांनी ३० जानेवारीस खर्चासाठी ३१ गोणी (दीड टन) काांदा कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत आणला. प्रतवारी करण्यासाठी चार महिला व गोण्या भरण्यासाठी दोन मजूर एका दिवसासाठी लावले होते. तर कांदा भरण्यासाठी २५ रूपयांप्रमाणे रिकाम्या गोण्या आणल्या होत्या.कर्जत बाजार आवारात गेल्यानंतर आडते व्यापाºयांनी लिलावात प्रतवारी करून ९ गोणी कांद्याचा दीड रूपया किलोप्रमाणे व उर्वरित २२ गोणी कांद्याचा भाव एक रूपया किलो प्रमाणे काढला. ३१ गोण्यांमधील १ हजार ४७५ किलो कांद्याचे १६९० रूपयांचे बिल खराडे यांच्या हातात पडले. या बिलामध्ये कांदा व्यापाºयाने हमाली १२४ रूपये, तोलाई ९३ रूपये, लेव्ही ६२ रूपये, मोटारभाडे ६०० रूपये व इतर खर्च १ रूपया असा एकूण ८८० रूपये खर्च दाखविला. त्यामुळे एकूण १६९० रूपयांच्या बिलातून हा खर्च वजा करून खराडे यांच्या हातात ८१० रूपये मिळाले.खराडे यांनी बारदाना दुकानदाराला व मजुरांना कांदा विक्रीतून आलेल्या पट्टीतून पैसे देण्याचे कबूल केले होते. यात घरातील राबलेल्या दोन माणसांचा खर्च तो वेगळाच. या बिलातूनही आडते व्यापारी भिताडे यांनी ७२० रूपयेच रोख हातात दिले. ९० रूपये कशाचे घेतले हे विचारणा असल्याचे सांगितले.दीड एकरात ६० गोणी झालेल्या या कांद्याच्या उत्पादनासाठी बारा हजार रूपयांहून अधिक खर्च झाला. त्यातील ३१ गोणी कांद्यांची विक्री केली. उर्वरित २९ गोण्या बाजार भाव नसल्याने शेतातच विस्कटून टाकल्याचे खराडे यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितले. आता बारदाण्याचे आणून देतो म्हणून सांगितलेले ७७५ रूपये, सहा मजुरांचे चौदाशे रूपये पदरचे देण्याची नामुष्की ओढावल्याचे खराडे यांनी सांगितले.