अहमदनगर : गावरान कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असल्याने कांद्याचे दर घसरत असून गुरुवारी नगर बाजार समितीत झालेल्या लिलावात कांदा दीड हजारांपर्यंत खाली आला. हे गेल्या वर्षभरातील निचांकी दर आहेत.
मागील वर्षी समाधानकारक पडलेल्या पावसामुळे पाण्याची स्थिती चांगली असल्याने उन्हाळी कांद्याचे उत्पादन वाढले आहे. गेल्या महिनाभरापर्यंत कांद्याला ३ हजारांपर्यंत भाव होता, परंतु १ मार्चपासून मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात येत असल्याने प्रत्येक लिलावात भाव घसरत आहेत. तीन हजारांहून कांदा अडीच, दोन व आता थेट दीड हजारांपर्यंत खाली आला आहे. गेल्या वर्षभरात कांद्याचे भाव टिकून होते. दिवाळीच्या दरम्यान तर कांद्याच्या भावाने दहा हजार रुपयांपर्यंत मजल मारली होती. हाच भाव टिकून राहील या अंदाजाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली. याच वेळी इतर राज्यांतही पाण्याची उपलब्धता असल्याने तिकडेही कांद्याचे उत्पादन घेतले गेले. त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याची मागणी काही प्रमाणात घडली. मागणी घटल्याचा व आवक वाढल्याचा परिणाम भाव कमी होण्यात झाला आहे.
नगर बाजार समितीत गुरुवारी (दि. १८) ७३ हजार ३३३ कांदा गोण्यांची (४० हजार ३३३ क्विंटल) आवक झाली. त्यात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला १३०० ते १५०० रुपयांचा भाव मिळाला.
-------------
गुरुवारच्या लिलावातील कांदा दर
प्रथम प्रतवारी - १३०० ते १५००
द्वितीय प्रतवारी - १००० ते १३००
तृतीय प्रतवारी - ७०० ते १०००
चतुर्थ प्रतवारी - ४०० ते ७००