श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दहा दिवसांपूर्वी ३० रुपये किलोवर असलेले कांद्याचे दर कोसळले आहेत. मध्य प्रदेशामधील जुन्या कांद्याची विक्री अद्यापही उत्तर भारतातील बाजारामध्ये होत आहे. त्यामुळे दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये नगर व नाशिक जिल्ह्यातील कांद्याची विक्री बंद झाली आहे. पुढील काळात दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे.बुधवारी कांद्याला १० ते १६ रुपये किलोपर्यंत दर मिळाले. जुना साठवण कांदा नोव्हेंबरपर्यंत संपुष्टात येतो. यंदा मात्र, अजूनही ३० टक्के माल शिल्लक राहिल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच आता लाल कांदा बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यामध्ये हा कांदा मोठ्या प्रमाणावर येऊन दरात घट होईल. मध्य प्रदेशमध्ये कांद्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा येथील बाजारपेठेत तो कांदा टिकून आहे. तुलनेत मध्य प्रदेशाचा कांदा दोन ते चार रुपये स्वस्त मिळतो. श्रीरामपूर येथील कांदा उत्तर भारत व दक्षिण भारतामध्ये समसमान विक्री होतो. आता मात्र, उत्तरेमध्ये केवळ १० टक्के माल रवाना होतो, अशी माहिती व्यापारी जितेंद्र गदिया यांनी ‘लोकमत’ला दिली.
बांगलादेश भारताचा सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश होता. त्यानंतर श्रीलंकेचा समावेश होता. आता बांगलादेशमध्ये कांदा उत्पादन होत आहे, तसेच तेथे निर्बंध आहेत. श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीत गेला आहे. त्यामुळे येत्या काळात नाशिक व नगर जिल्ह्यातील कांद्यासाठी चांगले चित्र नाही. - नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव बाजार समिती.
उन्हाळ कांदा घसरलानाशिक जिल्ह्यातील लासलगाव, उमराणेसह इतर बाजार समित्यांमध्ये बुधवारी उन्हाळ कांदा दरात घसरण झाली आहे. लासलगाव बाजार समितीत ५०० ते १८०० रुपये तर उमराणे बाजार समितीत ७०० ते १४०० रुपये भाव मिळाला. गेल्या सात महिन्यांपासून भाववाढीच्या अपेक्षेने राखून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याचे दर निम्म्याने घसरल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.